Tuesday, November 19, 2024
Homeताज्या बातम्याडॉ अमोल कोल्हेंचे 'भावी आमदार' विधान आणि व्यासपीठावरून उतरत ठाकरेंच्या संतप्त...

डॉ अमोल कोल्हेंचे ‘भावी आमदार’ विधान आणि व्यासपीठावरून उतरत ठाकरेंच्या संतप्त शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी 

डॉ अमोल कोल्हे यांच्या देवदत्त निकम यांच्या ‘भावी आमदार’ या उल्लेखावरून शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत  प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक नडलाय आणि भिडलाय हा जो विजय आहे तो शिवसेनेचा आहे असे ठणकावून सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वाघांनी कोल्हेंना यांना प्रश्न विचारत आपला रोष व्यक्त केला.

महाविकास आघाडीत महाबिघाडी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करत राडा घातला.

शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe ) यांचा मंगळवारी (ता. ११ जून) मंचर येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात बोलताना डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम ( Devdutt Nikam) यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून खाली उतरत जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे कोल्हे यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

लोकसभा मतदारसंघातील विजयाबद्दल डॉ. अमोल कोल्हे यांची आज मंचर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर झालेल्या जाहीर सत्कार समारंभात हे राजकीय नाराजीनाट्य घडले.शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावेत. त्यात आंबेगाव मतदारसंघाचा समावेश असावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर आणि शिवसेनेचे संघटक राजाराम बाणखेले यांनी केली.

देवदत्त निकम यांनी २०१९ आणि २०२४  च्या लोकसभा निवडणुकीचे उत्कृष्ट नियोजन केले, त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे, असे असे कौतुक करत असतानाच खासदार कोल्हे यांनी निकम यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख केला आणि त्याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, संघटक राजाराम बाणखेले, दत्ता गांजाळे, दिलीप पवळे, सुरेखा निघोट यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांनी त्याच ठिकाणी घोषणाबाजी सुरू केली. व्यासपीठाशेजारीच हा गोंधळ सुरू असल्यामुळे डॉ. कोल्हे यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे हे शिवसैनिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, शिवसैनिकांच्या भावना संतप्त होत्या. स्वतः कोल्हेंनीही शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाच शिवसैनिकांनी सवाल केला.

अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 

आम्ही विरोधकांचे वार छातीवर झेलले : बाणखेले
लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही कोल्हे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. विरोधकांचे वार आम्ही आमच्या छातीवर झेलले आहेत. असे असताना विधानसभेच्या जागेचा फार्म्युला जाहीर होण्याच्या अगोदरच निकम यांची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोल्हे यांना कोणी दिला, असा सवाल बाणखेले यांनी केला.

प्रचारादरम्यान अनेकदा आमचा अपमान : सुरेश भोर
जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले, मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी कोल्हे यांच्यासाठी रात्रंदिवस काम केले आहे. प्रचारादरम्यान शिवसैनिकांचा अनेकदा अपमान झाला आहे. मतमोजणीच्या वेळी कोल्हे यांचा पास देणे आवश्यकत असताना मला एका अपक्ष उमेदवाराचा पास दिला. तो माझ्या पदाचा अवमान होता, त्यामुळे मी मतमोजणीला थांबलो नाही. 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आणले. मात्र, डॉ. कोल्हे यांच्या एका विधानामुळे आघाडीच्या ऐकीत मिठाचा खडा पडला असून शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!