नवदांपत्याच्या लग्नाला अवघे दोनच दिवस झाले होते,संसाराला सुरुवात होण्याअगोदरच त्यांच्यावर काळाचा दुर्दैवी घाला
पुणे – बोरावके मळा ( खळद, ता.पुरंदर) जेजुरी देवदर्शनासाठी व कुलाचार करून परतणाऱ्या कुटुंबाची रिक्षा पुणे पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये गेल्याने रिक्षा क्रमांक एमएच-१२ क्यूई ७७०६ या रिक्षामधील दोनच दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नव दांपत्यासह एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली तर अपघातातील दोघांचा जीव वाचला असून नव्याने संसाराला सुरुवात होण्याअगोदरच नवविवाहितांचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातामध्ये रोहित विलास शेलार(वय-२३),वैष्णवी रोहित शेलार.(वय -१८) ,श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला असून आदित्य मधुकर घोलप (वय -२२) आणि शितल संदीप शेलार. (वय-३५) हे जखमी झालेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी नवविवाहित आले होते. त्यांच्याबरोबर अन्य तिघे होते. जेजुरी देवदर्शन व कुलाचार करून परतणाऱ्या कुटुंबाची रिक्षा थेट विहिरीत कोसळली आणि या अपघातात नवदाम्पत्याचा व अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी अंत होत शेलार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबतची माहिती त्यांनी सासवड पोलिसांना दिली सासवड पोलिसांनी या दोघांसह इतर तिघांना भोर येथील रेस्क्यू टीम, जेजूरी व सासवड येथील अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांच्या साहय्याने क्रेनद्वारे बाहेर काढले. यातील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून रिक्षाचा अपघात नेमका कसा झाला ? हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील तपास भोर पुरंदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडे पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.