कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गणपती उत्सवादरम्यान गौराई आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शिनगारे कुटुंबाच्या घरी पारंपारिक वेशभूषेत, आकर्षक देखावा, रांगोळ्या, सडा शिंपण आणि विद्युत रोषणाईत गौराईचे स्वागत करण्यात आले. महिलांच्या उखाणे, झिम्मा,फुगडी,गीतगायनाने आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला.
अशी पारंपारीक गाणी म्हणत शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे लाडक्या गणरायाच्या आगमन सोहळ्यानंतर अवघ्या भाविकांना आतुरता लागून असलेल्या गौराईचे आगमन अनुराधा नक्षत्रावर झाले. महालक्ष्मींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच महिलांची लगबग सुरू होती. घरात हळदी-कुंकवाची पावले काढत त्यावरून गौराईंना आणण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करत गौराईंची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
गौरी गीते गात आणि पारंपारिक पद्धतीने सुवासिनिंनी गौराईची पूजा केली. दारी आलेल्या माहेरवाशिणी गौराईचे मंगलमय स्वागत करण्यात आले. शिनगारे कुटुंबीयांनी विशेष आकर्षक सजावट आणि एकविरा देवीच्या मंदिराची प्रतिकृती साकारत गौराई व श्री गणेशाची पूजन सोहळ्यात प्रतिष्ठापना केली.
गौराईच्या आगमनाने घरोघरी मांगल्य पसरले असून महिलांमध्ये विशेष उत्साह आहे. मंगलमय वातावरणात महिलांनी हळदी-कुंकवाने गौराईचे स्वागत केले. त्यानंतर विधिवत पूजन करून महालक्ष्मींचे महापूजन करण्यात आले. महिलांनी गाणी म्हणत फेर धरत, उखाणे घेत धार्मिक कार्यक्रम साजरा केला. पूजनानंतर पुरणपोळी, लाडू, करंजी, भाज्या आणि अन्य स्वादिष्ट पदार्थांचा नैवेद्य गौराईंना अर्पण करण्यात आला.