गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या काही सेकंदात चितपट करत ‘ महाराष्ट्र केसरी’ वर कोरले आपले नाव
फुलगाव (ता.हवेली) येथे झालेल्या ६६ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरला आहे.गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि मानाची गदा हुकली; परंतु नाउमेद न होता वर्षभर प्रयत्न करून सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला तेवीस सेकंदामध्ये चीत करत महाराष्ट्र केसरीचा बहुमान आणि मानाची चांदीची गदा मिळवली.(Maharashtra Kesari)
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा पार पडली.गादी विभागात शिवराज राक्षे याने सेमी फायनलमध्ये हर्षद कोकाटे याचा पराभव केला होता आणि माती विभागात सिकंदर शेख याने संदीप मोटे याचा सेमी फायनलमध्ये पराभव करुन फायनल गाठली होती.(Maharashtra Kesari) त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यात सिकंदर शेखनं विजय मिळवत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा मिळवली.
महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावल्याबद्दल पैलवान सिकंदर शेख यास कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ आम्हा मोहोळ कुटुंबियांच्या वतीनं मानाची चांदीची गदा बक्षीस स्वरुपात दिली. यावेळी पैलवान सिकंदरचं मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छा दिल्या.(Maharashtra Kesari)
सिकंदर शेख याचा अल्प परिचय सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गाव आहे.त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ तिथेच राहतात. सिकंदरच्या कुस्ती सुरुवात मोहोळमधूनच सुरु झाली. घरी हालाखीची आर्थिक परिस्थिती असुनही त्याच्या आई-वडिलांनी त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहित केलं. सिकंदर शेख याला आपल्या आजोबांपासून कुस्तीचा वारसा मिळाला आहेसिकंदरने आतापर्यंत अनेक कुस्ती स्पर्धेत सहभाग घेत पदकांची, बक्षीसांची लयलूट केली आहे. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख याला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता यंदाच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावण्याचं स्वप्न अखेर सिकंदर याने पूर्ण केलं आहे सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले.सिकंदर नऊ-दहा वर्षांचा असताना मोहोळमधल्या फाटे तालमीत त्याचा कुस्तीचा सराव सुरु झाला.(Maharashtra Kesari)
सिकंदर शेखचा तालमीत प्रवेश – २२ वर्षांचा सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे. लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना चित केल्यामुळे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला. “मोहोळमध्ये चंद्रकांत काळे हे त्याचे वस्ताद होते. त्यानंतर सिद्ध नागेश तालमीत सराव केला. हलाखीची परिस्थिती असूनही सिकांदरला तालमीत पाठवायचं हा आई-वडिलांचा निर्णय होता. सिकांदरचे वडील रशिद हे चांगले कसलेले पैलवान होते. त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी तिशीत आल्यावर त्यांनी पैलवानी सोडली. पण जेव्हा ते पैलवानी करत होते तेव्हा पण हमाली करत होते. खुराक-पाण्यासाठी पैसे नसायचे त्यामुळे पैलवानी करता करता ते हमाली करायचे,” असं सिकंदरने मागे एका मुलाखतीत सांगितले होते.