सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nagar Highway) सरदवाडी (ता.शिरुर) येथे शनिवार दि १ जुन २०२४ रोजी रात्री पहाटे साडेतीनच्या दरम्यान भरधाव असणाऱ्या मालवाहू कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने रस्ता दुभाजक ओलांडून थेट सलूनच्या दुकानाला धडक दिली. पहाटेच्या वेळी रहादारी कमी असल्यामुळे एवढा मोठा अपघात होऊनही सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच १२ एम व्ही ६९३९ हा मालवाहू कंटेनर पोकलॅन मशीन घेऊन पुण्याकडुन-अहमदनगरकडे जात असताना सरदवाडीजवळ आल्यानंतर कंटेनर चालविणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनरने थेट रस्ता ओलांडून सलूनच्या दुकानाला धडक दिली. सदरचा परिसर हा लोकवस्तीचा असुन पहाटेची वेळ असल्यामुळे सलुनचे दुकान बंद होते. इतर वेळेस वर्दळीचे असलेल्या या ठिकाणी पहाटेच्या वेळेस कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
या अपघातामध्ये सलुन व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असुन इमारतीचेही नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की कंटेनर इमारतीला धडकल्यानंतर मोठयाने आवाज झाला. तसेच इमारतीमधील लोकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असता. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे पहाटेच्या वेळी हा अपघात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेमुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून वाहनचालकाकडुन नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सरदवाडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शिरुर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेबाबत अजुन कसलीही तक्रार दाखल झालेली नाही.