पुणे – पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील वरसगांव येथील वडीलोपार्जीत मिळकतिवर वारसानोंद करण्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल वामन घाडगे (वय ४४) यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदी दुरुस्त करुन, मिळकत घर नं. २५ च्या ८ अ उता-यावर तक्रारदार यांचे आईचे व मिळकत घर नं. २६ च्या ८ अ उता-यावर तक्रारदार यांचे स्वतःचे नाव दुरुस्त करुन संगणीकृत ८ अ चा उतारा देणेसाठी ग्रामसेवक विठ्ठल घाडगे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक विठ्ठल वामन घाडगे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे मिळकत घर क्र. २५ व २६ च्या ८ अ उता-यावर आईचे व तक्रारदार यांचे नावाची नोंद घेण्यासाठी व संगणीकृत उतारा तक्रारदार यांना देण्यासाठी पंचासमक्ष पाच हजार रुपयाची लाच रक्कमेची मागणी करुन, लोकसेवक विठ्ठल घाडगे यानी तक्रारदार यांचेकडून पाच हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करीत आहेत.