कोरेगाव भीमा – दिनांक १७ मार्च वढू बुद्रुक ( ता.शिरूर) येथील श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाच्या प्रारंभी दिनांक १७ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी ३०२० रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली अनोखी शंभूनिष्ठा व भक्ती व्यक्त केली .
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास प्रारंभी शंभू भक्तांनी सामाजिक जाणीव, कृतज्ञता व रुग्णांची सहाय्यासाठी एक सामाजिक व विधायक उपक्रम राबवून धर्मवीर छञपती संभाजी महाराजांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
श्री शंभूछत्रपतींनी स्वराज्यासाठी एक महिना मरणयातना सहन करुन फाल्गुन अमावस्येला आपला प्राणाचे बलीदान दिले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराजांचे स्मरण म्हणून श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील शंभूराजांच्या समाधीस्थळावर श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान पुणे यांच्यावतीने रक्तदान आयोजीत करण्यात आले होते. शंभुभक्तांनि रक्तदान करत अनोखे अभिवादन करत बलीदान मासाची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे सर्जिकल इन्स्टिट्युट, तर्पण ब्लड सेंटर, अक्षय ब्लड बँक या तीन रक्त पेढ्या येथे उपस्थित होत्या. प्रत्येक रक्तदात्याला शंभूराजांची प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी सर्व शंभू भक्त व रक्तदात्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती
आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले याची जाणीव म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे शंभू भक्तांनी व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी सांगितले.
बलिदान मासाचे महत्व व पाळण्याचे कारण – ज्यावेळी मुकरर्बखानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि औरंगजेबासमोर आणले तिथपासून ते महाराजांचे बलिदान हा संपूर्ण एक महिना म्हणजे बलिदान मास होय. महाराजांनी जो पुढे ४० दिवस अत्याचार सहन केला त्याची जाणीव प्रत्येकाला असावी म्हणून बलिदान मास पाळण्यात येतो.
यामध्ये महिनाभर चप्पल न घालणे, गोड पदार्थ वर्ज करणे, चहा बंद करणे, सुखाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ किंवा आवडती वस्तू यांचा त्याग करणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे आदी गोष्टी पाळण्यात येतात. सलग ४० दिवस नियमितपणे या ठिकाणी श्लोक पठण करण्यात येणार आहे.