विविध क्षेत्रातील आठ विदुषींना पुरस्काराने आले गौरविण्यात
मुंबई – विविध क्षेत्रातील आठ विदुषींना अष्टनायिका सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुसंवादिनी-मंगला खाडीलकर यांनी भुषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून निर्माती-दिग्दर्शिका, कांचन अधिकारी आणि भूलतज्ञ डॉ. अलका मांडके यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचा सुंदर सोहळा झाला.
या कार्यक्रमात रसिका धामणकर, विद्या प्रभू , सोनल खानवलकर, डॉ. श्वेता वर्पे, डॉ. सुचिता पाटील, डॉ. मृण्मयी भजक, अश्विनी देशपांडे, मीना गागरे या अष्ट नायिकांना, शाल व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विश्वभरारी फाउंडेशन-विलेपार्ले आणि नॅशनल लायब्ररी-वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, ‘अष्टनायिका सन्मान सोहळा’ आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांची संकल्पना विश्व भरारी फाउंडेशन अध्यक्षा लता गुठे आणि कार्यवाह प्रकाश गजानन राणे यांची होती. अष्ट नायिकांच्या वतीने सन्मानाला उत्तर देताना अश्विनी देशपांडे म्हणाल्या , या सन्मानाने आम्ही साऱ्याजणी भारावून गेलो आहोत. कार्यक्रमाला आल्यावर आम्हा सर्वांना माहेरी आल्यासारखे वाटत आहे.कार्यक्रमाची सुरुवातीस दिपाली बोबडे यांनी दमदार आवाजात पोवाडा गाऊन संपूर्ण सभागृहाला वीर रसात न्हाऊ घातले.
नॅशनल लायब्ररीच्या ग्रंथपाल धनश्री कुलकर्णी यांनी वाचनालयाच्या वतीने प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कांचन अधिकारी यांची मुलाखत डॉ. मृण्मयी भजक व प्रकाश गजानन राणे यांनी घेऊन प्रेक्षकांना स्त्री सक्षमीकरण काय असू शकते याचे प्रबोधन केले. कांचन अधिकारी यांची चौफेर फटकेबाजी करणारी मुलाखत झाली तर मंगला खाडिलकर यांची मुलाखत तेजेस्विनी मुंडये आणि प्रकाश गजानन राणे यांनी घेऊन त्यांच्याकडून अनेक मार्गदर्शनपर गोष्टी ऐकविल्या. डॉ. अलका मांडके यांनी छोटेखानी भाषणात प्रेक्षकांची मने जिंकली.