शिक्रापूर (ता.शिरूर) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई केली असून शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका खाजगी इसमासह कर्मचाऱ्यास धामारी येथील स्टँड जवळील रस्त्यावर ३ हजारांची लाच स्वीकारणे व लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणुन त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याने शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील महसूल व भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार याची शेतजमीनीची हद्द कायम करण्याकरीता त्यांनी भुमी अभिलेख कार्यालय, शिरुर येथे रितसर अर्ज करुन, त्यासाठी लागणारी शासकीय फी भरलेली होती. भुकरमापक शिवराज बंडगर ( वय २४) हे धामारी येथे आल्यावर त्यांच्या सोबत असणारे खाजगी इसम अमोल कदम (२७ वर्ष ) यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या दोन गटाची शेतजमीन मोजणी करण्याकरीता व हद्द निश्चित करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी केले बाबतची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, खाजगी इसम अमोल कदम याने तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या शेतजमीन मोजणी करण्याकरीता व हद्द निश्चित करण्यासाठी तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करुन, खाजगी इसम अमोल कदम यांनी तीन हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली व लोकसेवक भुकरमापक शिवराज बंडगर यांनी आरोपी खाजगी इसम अमोल कदम याच्या लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणुन त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. सदर प्रकरणाचा ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.