कुटुंबाचा करता पुरुष हरपल्याने… मुलांच्या भविष्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न कठीण…सोसायटीच्या बिल्डरकडून मदतीची अपेक्षा … कामावर असताना मृत्यू झाल्याने मिळणार का भरपाई …
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील खेडकर वस्तीवरील ‘आपलं घर’ संतोष महाजन सोसायटीत विजेच्या धक्क्याने तेथील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
संतोष पांडुरंग महाजन (वय ३२, रा. आपलं घर सोसायटी, रांजणगाव गणपती) असे शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, ते मूळचे मोहाडी (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील राहणारे होते. सध्या ते ‘आपलं घर’ सोसायटीत पत्नी व मुलांसह वास्तव्यास होते. मृत महाजन यांचेसमवेत काम करणारे आनंदा कोंडू गोपाळ (मूळ रा. खडकी, ता. जामनेर,जि. जळगाव) यांनी याबाबतची खबर दिल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
महाजन हे गेल्या पाच वर्षांपासून ‘आपलं घर’ सोसायटीत कामाला होते. बुधवारी दुपारी सोसायटीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील अर्धवट बांधकाम चालू असलेल्या व भिजलेल्या रूममधील बाथरूमच्या स्वीच बोर्डमध्ये वायर घालत असताना त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला व ते तेथेच कोसळले. आनंदा गोपाळ यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतील महाजन यांना रांजणगाव येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच महाजन यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी जबाबदार असणारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका महाजन यांच्या नातेवाइकांनी घेतली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडेही नातेवाइकांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करावी व जबाबदार असणारांवर कारवाई करण्याची मागणी केली. स्थानिक काही लोकांनी आमच्यावर दबाव आणला असल्याचा आरोपही मृत महाजन यांच्या नातेवाइकांनी केला. याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
संतोष महाजन यांच्या पश्चात पत्नी तसेच कृष्णा हा अकरा वर्षांचा आणि भूषण आठ वर्षांचा अशी दोन मुले आहेत. ते भूमिहीन असल्याने सोसायटीच्या मालकांनी महाजन यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी स्थानिक सामाजिक संघटनांनी केली आहे.
संतोष महाजन त्यांचे तरुणपणात दुर्दैवी विजेच्या धक्क्याने निधन झाल्याने कुटुंबातील ते एकमेव कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार गेला आहे.उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही की शेती नाही त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांच्या व पत्नीच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून येथील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना आर्थिक मदत करत आहे.पण ज्या बिल्डरकडे ते काम करत होते त्यांच्या कडून आर्थिक मदत होऊन मुलांच्या शिक्षणाचा पुढील खर्च त्यांनी करावा व त्यांच्या पत्नीला आर्थिक नुकसान भरपाई देऊन आपल्या कामगाराच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.