तरुणाच्या अपघाती निधनाने लाखणगाव पंचक्रोशीवर शोककळा
पुणे -लाखनगाव (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत गायरानाच्या समोर बेल्हे जेजुरी हायवे रोडवर अल्टो गाडीने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली असून अवघ्या १९ वर्षीय तरुणाच्या अपघाती निधनाने लाखणगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पारगाव पोलीस ठाण्यात येथे दत्तात्रय दौंड यांनी फिर्याद दाखल केली असून , याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रसिक रंगनाथ दौंड (वय १९ )रा. लाखनगाव दौंडवस्ती (ता. आंबेगाव) हा सकाळी त्याच्या जवळील दुचाकी एम.एच १४ सी क्यू ९८३१ हिच्यावरुन जात असताना बेल्हे जेजुरी महामार्गावरून पाठीमागून येणाऱ्या अल्टो गाड़ी नंबर एम एच १० के एस ८०८७ या अल्टो गाडीने पाठीमागून जोरदार •धडक दिल्याने दुचाकी दौंड याला डोक्यास व हातापायास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी अल्टो चालक सागर भिमाजी साळवे (रा. साकुर मांडवे ता. संगमनेर जि. अहमदनगर ) यांच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सागाडे करत आहेत.
रसिक दौंड याच्या अपघाती मृत्यूने लाखनगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकतीच दहावीचे शिक्षण पूर्ण झालेल्या रसिक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.नेहमी हसतमुख शांत स्वभावाच्या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाच्या अपघाती निधनाने लाखणगाव पंचक्रोशीत शोक व्यक्त करण्यात येत असून तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.