आईच्या कष्टाची व त्यागाची जाणीव ठेवत आईच्या अंत्ययात्रेसाठी मुलाने एक वर्षापूर्वी तयार केली होती पालखी
कोल्हापूर – आत्मा आणि ईश्वर यांच्या सुवर्ण संगमाने आई शब्दाची महती वूजत करतात तर आई या शब्दात आपले संपूर्ण आयुष्य सामावलेले असते. अचानक पायाला ठेच जरी लागली तरी आपल्या तोंडातून आई शब्दाचा उच्चार येतोच. सध्याच्या युगात अनेकजण आपला जन्म दिलेल्या माता-पित्याला वृद्धाश्रमात पाठवत कर्तव्यापासून पळताना दिसतात. तर अनेकवेळा मुलगा सांभाळत नाही म्हणून वयोवृध्द आईला काम करावे लागते. एका बाजूला आत्ताची पिढी संस्कार, प्रेम विसरत असतानाच, कोल्हापुरातील उंदरवाडी येथील एका मुलाने मात्र आई वारल्यानंतर तिची पालखीतून अंत्ययात्रा काढली आहे. या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.
आईचे केले पाद्यपूजन – कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता असलेले मारुती पाटील यांचे आईवर अत्यंत प्रेम होते. आई भगिरथी शिवाजी पाटील यांनी परिस्थिती नसतानाही मोलमजुरी करुन पोरांना वाढवले. खूप कष्ट सोसले त्यामुळे मारुती पाटील कमवते झाले. तेव्हापासून आपल्या आईला काही कमी पडू दिले नाही. आईला विचारुन तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही दिवसापूर्वीच सर्व नातेवाईकांना बोलावून आईचे पाद्यपूजन कार्यक्रमही केले.
एकवर्षे आधीच करुन घेतली पालखी – एक वर्षापूर्वीच त्यांनी आपल्या आईच्या निधनानंतरसुद्धा पालखीतून अंत्ययात्रा काढणार असे ठरवले होते. त्यानंतर सरवडे येथील सुतार बंधूकडे पालखी बनवण्यासाठी सांगितले होते. एक वर्षापूर्वीच पालखी तयार झाली होती. बुधवारी वयाच्या ८७ व्या भगिरथी शिवाजी पाटील यांचे निधन झाले. आईचे निधन झाल्यावर तिची अंत्ययात्रा त्याच पालखीतून काढण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भगिरथी पाटील या उंदरवाडी गावच्या सरपंच अनिता पाटील यांच्या सासू व सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील यांच्या मातोश्री होत्या.