राजगुरुनगर – देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’ने खेड तालुक्यात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात आज ६८२ जणांनी रक्तदान केले.
पुणे जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक अपघात, नैसर्गिक आपत्तीत रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे ही रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून संपूर्ण शिरुर लोकसभा मतदारसंघात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानुसार आज खेड व शिरुर (३९ गावे) तालुक्यात एकूण १६ ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले.
या रक्तदान शिबिराचे महत्व केवळ रक्तसंकलन इतकेच न ठेवता त्याला सामाजिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करताना खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रत्येक रक्तदात्याला ३ लाखांचा अपघाती विमा आणि ३ लाखांचा जीवन विमा असे एकूण ६ लाखांचे विमा कवच उपलब्ध करून दिले आहे. यामागची भूमिका स्पष्ट करताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातून एमआयडीसीत नोकरीसाठी येणारा कामगार वर्ग आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी यांची संख्या मोठी आहे. हे सर्व कामगार व विद्यार्थी रोज दुचाकीवर असुरक्षित वातावरणात प्रवास करतात, त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. या अपघातातील जखमींना उपचारांचा खर्च पेलवणारा नसतो. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनाचा विचार करुन जाणीवपूर्वक ६ लाखांचे विमा कवच देऊन काही प्रमाणात सहाय्य व्हावे असा प्रयत्न केला आहे.
आजच्या या शिबिरात सुमारे ६८२ जणांनी रक्तदान करीत या विमा कवचाचा लाभ घेतला. त्याचबरोबर रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीही जपली, त्याबद्दल तालुक्यातील सर्व रक्तदात्यांचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आभार मानले.
ब बीबीबीरक्तदान शिबीर आयोजन करण्यासाठी खेड तालुक्यातून अमित घुमटकर, राहुल नायकवडी, मोबिन काझी, कुमार गोरे, गणेश पवळे, दत्ता मोरे, रोहिदास पवळे, सुधीर माशेरे, सागर लोखंडे, राहुल चौधरी, भानुदास चव्हाण, अतुल ठाकुर, शरद मोरे, जालिंदर गवारी, अमोल सोनावणे, शांताराम सोनावणे, दत्ता होले, पोपट सोनावणे, अकबर इनामदार, दत्तानाना ढमाले, निवृत्ती नेहरे, स्वराज्य रक्षक संभाजी युवामंच आंबोली आणि शिरुर तालुक्यातून (३९ गावे) मानसिंग पाचुंदकर, सर्जेराव खेडकर, अजित गावडे, विजय थोरात, प्रमोद पऱ्हाड, सूर्यकांत थिटे, मुकुंद नरवडे व नाना फुलसुंदर आदींनी परिश्रम घेतले. या सर्व सहकाऱ्यांचेही खासदार डॉ. कोल्हे यांनी आभार मानले.