राजगुरुनगर –
शाळेच्या पहिल्याच दिवशी एकीकडे विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करणायत येत होते तर राजगुरू नगर मधील एका शाळेत विद्यार्थ्यांनी चालू वर्षाची शैक्षणिक फी न भरल्यामुळे शाळेने पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून व्हरांड्यात बसवल्याची धक्कादायक व खळबळ जनक घटना घडली असून याबाबत विविध माध्यमातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यभरात शाळेचा पहिला दिवस म्हणुन सर्व शाळा विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करताना दिसत आहेत मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांचचे असे स्वागत झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजगुरुनगर मधील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या शेठ केशरचंद पारख या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरूवारी दिनांक १५ रोजी प्रकार घडला. चालु वर्षाची शैक्षणिक फी या विद्यार्थ्यानी भरली नव्हती शाळेत सुमारे सातशे आठशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थी शाळेत आल्यावर फी भरणारे व न भरणारे यांची वर्गवारी करून फी भरणारांना वर्गात बसू दिले. बाकीच्यांना बाहेर काढण्यात आले. त्यातील काही मुले घरी गेली तर काही व्हरांडयात बसून राहिली. पहिला दिवस म्हणुन उत्साह आणि आनंदाने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून शाळेच्या व्हरांडयात बसवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे सोपान डुंबरे, नितीन ताठे यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर एक तासाने विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले.
मागील तसेच चालु शैक्षणिक वर्षाची फी द्यावी म्हणुन पालकांना वारंवार सांगण्यात आले. मात्र शाळेची फी न मिळाल्याने पालकांना महिती द्यावी म्हणून काही वेळ विद्यार्थ्याना वर्गाबाहेर थांबवले होते. असे शालेय समितीकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत असून शाळेच्या या कारवाईचा निषेध करुन शिक्षण विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.