पुणे – गेल्या काही वर्षात अनेकांना सोशल मिडियावर सक्रिय राहण्याची सवय लागली आहे. त्यामध्ये उच्चशिक्षित युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. धार्मिक, राजकीय, देशविरोधी विषयांवर पटकन रिॲक्ट होण्याची सवय आणि भावनेच्या भरात किंवा अनवधानाने का होईना सोशल मीडियावर केलेल्या एका चुकीच्या पोस्टमुळे संपूर्ण करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे भविष्याचा सारासार विचार करूनच सोशल मीडियावर पोस्ट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कोल्हापूरअध्ये झालेल्या हिसंचार असो की मागील काही दिवसांमध्ये झालेल्या घटना असो याबाबत व्यक्त होताना तरुणाईने भान बाळगायला हवे अन्यथा एक आक्षेपार्ह पोस्ट आयुष्य उद्ध्वस्त करू शकते याची जाणीव ठेवायला हवी. राज्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. पण, तरुणांनी त्याला बळी न पडता स्वत:चे आयुष्य, आपले आई-वडील, भाऊ-बहिणीचा विचार करावा.सोशल मीडियावरील एक आक्षेपार्ह पोस्ट तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरू शकते.
एकदा गुन्हा दाखल झाला की पुन्हा शासकीय नोकरी नाही, ना परदेशात शिक्षणाची संधी, हे तरुणांनी ध्यानात ठेवावे. तसेच पालकांनीही आपली मुले काय करतात, कोणासोबत फिरतात यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.सध्या तरुणांकडून व्हॉट्सॲप, ट्टिटर, फेसबुक व इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मागील साडेतीन वर्षांत तरुणांनी साडेचौदा हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केल्या आहेत.तर यावर्षी सायबर पोलिसांनी ३७८ आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या आहेत. दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल आणि त्यातून सामाजिक शांतता-सुव्यवस्था बिघडविण्याचे कृत्य करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच आहे.
काहीजण विनाकारण औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून करीत आहेत. परंतु, धार्मिक व जातीय सलोखा ठेवून सर्वांनी मैत्रिपूर्ण नातेसंबंध जोपासावेत.गुन्हा दाखल झाल्यावर सोडवायला कोणी येत नाही -गुन्हा दाखल झाल्यावर सोडवायला कोणीही येत नाही. त्यावेळी तुरुंगातील मुलाला पाहून आपल्या आई-वडिलांचे, शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या भावाचे, विवाहाच्या वयात आलेल्या बहिणीचे काय हाल होतील, याचाही तरुणांनी नक्की विचार करण्याची गरज आहे. आई-वडिलांनी लहानाचे मोठे करताना तुमच्याबद्दल खूपकाही स्वप्ने रंगवलेली असतात. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे, सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे स्टेट्स ठेवणे असे प्रकार टाळावेत, अन्यथा दोन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास अटळ असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तरूण-अल्पवयीन मुलांनी शिक्षणातून स्वप्नपूर्ती करावीदोन जाती-धर्माच्या भावना दुखावतील, अशा आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमातून व्हायरल करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुले, महाविद्यालयीन तरुणांचाही समावेश आहे. पण, तो दखलपात्र अपराध असून एक पोस्ट आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरू शकते. नागरिकांनीही अशी पोस्ट पाहिल्यास कायदा हातात न घेता जवळील पोलिस ठाण्यास कळवावे. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल.