बांधावरून सांडपाणी नेण्याची नागरिकांची तहसीलदार, गट विकास अधिकारी व ग्राम पंचायत यांना अर्जाद्वारे विनंती
कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील नरेश्वरनगर मधील रहिवाश्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सांडपाण्याची लाईन नसल्याने घराजवळ मोठ्या प्रमाणात सांडपाणी साठले असून त्याच्या दुर्गंधीने लहान बालके,महिला, वृध्द यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून जर तातडीने हा प्रश्न सोडवला नाही तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून याबाबतीत संबधित १०७ नागरिकांनी शिरूर तहसीलदार , गट विकास अधिकारी , ग्राम पंचायत यांना अर्ज दिला असून यावर तातडीने मदत करण्याची विनंती रहिवाश्यांनी केली आहे
सणसवाडीतील वढु बु” रस्ता लगत नरेश्वर नगर मोठी लोकवस्ती असून या लोकवस्तीचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी यापूर्वी खाजगी मोकळया जागेत नैसर्गिक उताराने जात होते.पण खाजगी जागेस पुर्णताः आर सी सी कम्पाउंड बांधकाम केले असल्याने सध्याच निर्माण होणारे सांडपाणी विल्हेवाट लावता येत नाही त्यामुळे सांडपाणी वस्तीतच साठत आहे व त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
महिला व लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून मुले आजारी पडत असून मच्छर व दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत यामुळे तातडीने मदत करण्याची विनंती नागरिकांमधून करण्यात येत आहे.
या साठी वस्तीतील शेजारी असणाऱ्या बांधावरून गटरलाईन सांडपाणी आणि पावसाचे पाणी जाण्यासाठी गटार लाईन करून पुढे नगर रोड जवळील ग्रामपंचायतीचे अस्तीत्वात असलेल्या गटर लाईनला जोडुन सांडपाण्याचा प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे. तरी सदर ठिकाणी इतर जागेतुन गटर लाईन करणेस परवानगी मिळण्यासाठी त्यांनी मदतीसाठी अर्ज दिला असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने मदत करण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.