वढु-तुळापूर प्रवास होणार आणखी सुलभ
एक जानेवारीला अभिवादन सोहळ्याच्या दिवशीही नगर रस्ताही राहणार सुरु
कोरेगाव भीमा – वढु बुद्रुक ( ता.शिरूर)
श्री छत्रपती संभाजी महाराज यांची पवित्र बलीदानस्थळे जोडणे तसेच दरवर्षी एक जानेवारीला पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामुळे बंद ठेवाव्या लागणाऱ्या पुणे-नगर हमरस्त्यासाठी पर्यायी मार्गही उपलब्ध व्हावा, या दोन्ही उद्देशासाठी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ते वढु खुर्द दरम्यान भीमा नदीवरील नियोजित पुलाचे काम स्थानिकांच्या सहकार्यामुळे येत्या दिड वर्षात पुर्ण होणार असल्यांची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.
या विषयी पुणे येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अतुल भोसले यांच्या दालनात आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस सहाय्यक अभियंता जान्हवी रोडे व संबंधित अधिकारी तसेच वढु बुद्रुक तसेच वढु खुर्द गावातील संबंधित शेतकरीही उपस्थित होते. यावेळी आमदार अशोक पवार तसेच कार्यकारी अभियंता अतुल भोसले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुलासाठीच्या भुसंपादनाबाबत शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या श्रीक्षेत्र वढु – तुळापूर या पवित्र बलीदानस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यरातून मोठ्या संख्येने शंभुभक्त येत असतात. नियोजित नव्या पुलामुळे या दोन्ही स्थळांमधील प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार असून येथे येणाऱ्या शंभुभक्तांचीही मोठी सोय हाेणार आहे. तसेच दरवर्षी एक जानेवारीला पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामुळे पुणे – नगर हमरस्ता बंद ठेवावा लागत असल्याने स्थानिकांसह प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. मात्र आता नव्या पुलामुळे शिक्रापूर-चाकण रस्ता – चौफुला – वढु बुद्रुक – तुळापुर फाटा – नगर रस्ता या मार्गे चाकण रस्ता ते पुणे – नगर रस्ता जोडला जाणार असल्याने बंद राहणाऱ्या पुणे – नगर हमरस्त्यासाठीही पर्यायी मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे या कामानंतर पुणे-नगर हमरस्ता बंद ठेवण्याचीही गरज पडणार नसून स्थानिकांसह प्रवाशांचीही गैरसोय टळणार आहे.
पुलासाठी ३४ कोटी ८६ लक्ष रुपयांचा निधी –
पुलाच्या या कामासाठी नाबार्डच्या माध्यमातून २२ कोटी ८६ लाख रुपये पुलाच्या कामासाठी तर १२ कोटी रुपये भुसंपादन खर्चासह एकुण ३४ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या निधीमुळे हा १२ मीटर रुंदीचा व २४० मीटर लांबीचा पुल येत्या दिड वर्षात पूर्ण होणार आहे. या कामाची वर्क ऑर्डर प्रक्रिया देखील पुर्ण झाल्याने हे काम वेगात पूर्ण होणार आहे. -श्रीमती जान्हवी रोडे ,सहाय्यक अभियंता, श्रेणी १