कोरेगाव भीमा – शिक्रापूर ता. शिरूर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांना ग्रामपंचायत कार्यालय समोर गाडी लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करुन जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन सरपंच रमेश गडदे यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू या सर्वांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर ) ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे शनिवारी रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत समोरील हनुमान मंदिरा शेजारुन जात असताना उद्धव झोडगे यांनी त्यांचा एम एच १२ आर एन १८९१ हा टेम्पो नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण होईल अशा पद्धतीने लावला होता, त्यावेळी सरपंच गडदे यांनी झोडगे एस टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले, त्यामुळे टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू या सर्वांनी मिळून रमेश गडदे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ, दमदाटी करुन जातीवाचक शिवीगाळ करत हाताने मारहाण केली, घडलेल्या प्रकाराबाबत सरपंच रमेश बबनराव गडदे वय ४८ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू ( पूर्ण नाव माहीत नाही ) सर्व रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी हे करत आहे.