तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) येथील शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या व्याजदर वाढीविरुद्ध तीव्र आक्रोश आंदोलन शिक्षक भवन कार्यालयासमोर करण्यात आले.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती ,जुनी पेन्शन संघटना ,एकल शिक्षक संघटना व शिक्षक भारती या शिक्षक संघटनांचे सभासद शिक्षक यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्याजदरवाढीचा विषय विषयपत्रिकेवर नव्हता असे असतानाही सत्ताधारी तीनच दिवसात सर्वसामान्य सभासद व विरोधी संचालक यांना विश्वासात न घेता व्याजदर वाढ केली आहे. या विरुद्ध आवाज उठवून संचालक मंडळाने व्याजदर जैसे थे ठेवावा व सर्वसामान्य सभासदांना दिलासा मिळावा याकरिता शिरूर तालुक्यातील बहुसंख्य सभासद या आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलनाला उपस्थित होते.
यावेळी सुनीता लंघे, सुनील शेळके, अविनाश चव्हाण, विकास उचाळे, प्रदीप ढोकले, साधना शितोळे, बाळासाहेब घोडे, किसन हरपुडे, शरद धोत्रे, डी के पवार, सुरेश शिंदे, माऊली पुंडे यांनी मनोगत व्यक्त केली.सर्व धरणेकरी सभासदांच्या वतीने उपसभापती अंजली शिंदे व विजय गोडसे यांनी निवेदन स्वीकारले. कैलास पडवळ यांनी सुत्रसंचालन केले. दिपक सरोदे यांनी आभार मानले.