तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे: कासारी फाटा ते तळेगाव ढमढेरे(ता.शिरूर) दरम्यान नवीन तयार करण्यात आलेला रस्ता व वेळ नदीवरील पुलाचा भराव अचानक आलेल्या पुराने वाहून गेला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) परिसरात दि.१७ रोजी रात्री नऊ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.रात्री दोन पर्यंत पावसाने जोरदार व दमदार हजेरी लावली.या आलेल्या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.तर वेळ नदीला पूर आल्याने कासारी फाटा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव वाहून गेला असून तळेगांव शी संपर्क तुटला.या रस्त्याने अचानक येणाऱ्या वाहनांना मोठा पुलाला भराव नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काल सोमवारी झालेल्या पावसाने ओढे नाले भरून वाहू लागले. हे पाणी वेळनदीला मिळाल्याने तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीला पूर आल्याने स्मशानभूमी लगत पाणी आले होते. तळेगाव ढमढेरे ते न्हावरे रस्त्यावर टाकळी भिमा,घोलपवाडी दरम्यान शेतातील पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले.त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुरळक वाहतूक सुरू होती.या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी आल्याने न्हावरे कडे जाणारी पीएमपी एल सेवा विस्कळित झाली होती. न्हावरे तळेगाव ढमढेरे दरम्यान ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आली आहे अशा ठिकाणी रस्त्याला कठडे वाहून गेले आहेत.तळेगांव ढमढेरे येथील वेळ नदीवर कासारी फाटा या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापूर्वी पीएमआरडी ने केले होते. सोमवारी रात्री झालेल्या पावसाने आलेल्या पुरामुळे दुसऱ्यांदा वेळ नदीवरील रस्ता आणि त्यावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे. तळेगाव ढमढेरे ते जगताप वस्ती कडे जाणाऱ्या पुलावर पाणी असल्याने त्यांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागला.
दरम्यान परतीच्या पावसाने सर्वच ओढे नाले तुडूंब भरले असून या बाजरी,मका,सोयाबीन, तरकारी पिके,भाजीपाला यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.अनेक शेतकऱ्यांनी कांदा रोपे लावली असून या पावसाने कांदा रोपांना सतत पाणी साचत असलेने रोपे सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दिवाळी तोंडावर आली असताना शेतकऱ्यांना तरकारी पिके टिकविणे मोठे आव्हान उभे राहिले आहे.या झालेल्या पावसाने झेंडू ला देखील फटका बसला असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या परिसरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस तोडणी कामगार दाखल होऊ लागले आहे मात्र सगळीकडे उसाच्या शेतात पाणीच पाणी असल्याने ऊस तोडणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसह ऊस तोडणी कामगारांना पडला आहे.