कुलदीप मोहिते कराड
कराड-“व्यक्तीच्या जीवनात पुस्तकं फार मोलाची कामगिरी करतात. जीवन का जगायचं? कशासाठी जगायचं? जगण्याची भूमिका काय? हे पुस्तकं स्पष्ट करतात. शब्द म्हणजे शक्ती आहे. भाषेवर प्रभुत्व असणारा माणूस जगावर राज्य करतो. माणसाला प्रतिष्ठा वेळ पाळण्याने मिळते. वेळ टाळण्याने नव्हे. तसेच माणसाने चांगले काम करताना लाजू नये, तर वाईट काम करताना लाजावे. हे सर्व आपल्याला पुस्तके शिकवतात. वाचनामुळे संवेदनशीलता निर्माण होते. वाचनाची जोड देऊन संघर्षाला पळवून लावता येते. व्यक्तीने ज्या त्या वयात त्या त्या वयाची ती वैशिष्ट्ये जपावीत. जीवन जगण्याचा मार्ग पैसा नाही, तर माणुसकी आहे.” असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या ज्युनिअर विभागाच्या ‘भाषा, वाॾ॰मय व वादविवाद मंडळाचे’ उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश पाटील सर यांनी केले.
पुढे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “फळ जसं पक्व होत जातं तसेच माणसाच्या आयुष्याचे आहे. म्हणजेच माणसाने उतारवयात गोड असलं पाहिजे संकट काळात कधीकधी पैशापेक्षा शब्द, शब्दांची प्रेरणा उपयोगी पडते हे कणा कवितेच्या माध्यमातून मुलांना सांगितले. तसेच कविताही कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करते. संघर्ष, दुःख, संकटात व्यक्तीची भाषा बदलते पण वाचन मात्र व्यक्तीला स्थितप्रज्ञ ठेवते. संवेदनशील बनवते व्यक्तीमध्ये करुणा निर्माण करते. व्यक्तीला चैतन्यमय ठेवते. व्यक्तीच्या जगण्याची भूमिका स्पष्ट करते उमेद निर्माण करते. जीवनाच्या कक्षा रुंदावते म्हणून मुलांनी वाचन करावे. पुस्तकांच्या सानिध्यात राहावे.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, “किशोर वयात मुले व्यक्त होत नाहीत. व्यक्ती व्यक्त झाली नाही तर वेडी होते. जगणे समतोल बनवण्याचे काम पुस्तके करतात. म्हणून वाचन करा. वाचन करून प्रगल्भ बना. स्वप्ने बघा, ती सत्यात उतरवा ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी भाषा वाॾ॰मय वाद विवाद मंडळ स्थापन केले आहे. याचा पुरेपूर वापर करून आपली संस्कृती व राष्ट्रप्रेम जपा. देशाचा सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम भाषा, वाॾ॰मय, व वादविवाद मंडळ करते.”
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती एस. आर. चव्हाण यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय के. एस. महाले यांनी करून दिला. सूत्रसंचालन सौ. पी. एस. सादिगले यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम प्रा. एन. बी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य आर. ए. कांबळे, प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.