जंगल प्रवासात घेतली औषधी वनस्पतींची माहिती
पुणे – दिनांक १० ऑगस्ट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीतील महिला पालकांनी निसर्ग सहलीचे आयोजन केले होते. वाबळेवाडी शाळेतील महिला पालकांनी एकत्र येत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी भेट म्हणून निसर्ग सहलीचे आयोजन केले. यात भोरगिरी ते भीमाशंकर हा पायी आठ किलोमीटरचा प्रवास विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची माहिती देत तसेच पर्यावरणाचे जीवनात असणारे अनन्यसाधारण महत्त्व सांगत यशस्वीरित्या पार केला.
या पायी प्रवासात एकूण 42 जणांनी सहभाग घेतला होता. हिरवागार परिसर, उंच उंच झाडी, डोंगरांमधून फुटणारे झरे, उंचावरून पडणारा धबधबा, जंगलातून जाताना येणारे पशुपक्ष्यांचे आवाज, पावसाच्या सरी, तुडुंब वाहणारी नदी आणि तेथील विलोभनीय दृश्य पाहून विद्यार्थी हरखून गेले. जंगलातून प्रवास करताना विद्यार्थ्यांनी तेथील औषधी वनस्पतींची माहिती घेतली. तसेच व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा वाबळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे आपल्या जीवनात असणारे अनन्यसाधारण महत्व विशद केले. तसेच जंगलात असणाऱ्या विविध वनस्पतींची माहिती करून दिली
त्यानंतर भीमाशंकर येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तेथील मंदिराच्या आजूबाजूला असणारे प्लॅस्टिक उचलून पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेत विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांनी भीमाशंकरच्या जंगलातच भोजनाचा आनंद घेतला. जेवण करून तृप्त झाल्यावर पुन्हा सहा किलोमीटरचा बसपर्यंतचा टप्पा विद्यार्थ्यांनी सहजगत्या पार केला. जंगल प्रवासाची ही अनोखी भेट महिला पालकांनी दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.