केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या उपक्रमाची सुरुवात
अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७५ लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट
दिल्ली – दिनांक १७ एप्रिल
‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते .याअंतर्गत देशभरात ११४ ठिकाणी एका दिवसात सुमारे सव्वा (१.२५)लाख रोपांची लागवड केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या दिवसभर चालणाऱ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७५ लाख रोपांची लागवड करण्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वृक्षारोपण आणि वृक्षांचे पुनर्रोपण यावर लक्ष केंद्रित करत असून या रोपांच्या वाढीवर लक्ष ठेवता यावे यासाठी जिओटॅगिंगवरही जास्त भर दिला जात आहे. केंद्रीय वृक्षारोपण मोहिमेचा शाश्वत आणि दीर्घकाळ परिणाम साधण्यासाठी लोकांनी पुढे येऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ. व्ही.के. सिंह आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्ष अलका उपाध्याय यांनी डासना, गाझियाबाद येथे आयोजित कार्यक्रमात रोपे लावली.
या कार्यक्रमावेळी सिंह यांनी, पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आम्ही एक व्यवहार्य आणि शाश्वत परिसंस्था तयार करण्यासाठी काम करत आहोत. ही वृक्षारोपण मोहीम पर्यावरण संवर्धनात महत्वपूर्ण योगदान देईल.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्ष अलका उपाध्याय यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठी देखील खूप मेहनत घेत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत राष्ट्रीय महामार्गांलगतच्या जलस्रोतांचे पुनर्भरण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी संपूर्ण भारतभर वनीकरण आणि ‘अमृत सरोवर’ निर्मितीला चालना देण्यात येत आहे.
पर्यावरणाच्या शाश्वततेचा संदेश प्रसारित करण्यासाठी या मोहिमेत अनेक राज्यांमधील लोकप्रतिनिधी, समाजातील स्थानिक लोक, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिला बचत गट (SHGs) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात जलस्रोत आणि भूजल पुनरुज्जीवित करण्यास मदत म्हणून वृक्षारोपण मोहीम आणि राष्ट्रीय महामार्गांलगतच्या भागात तलाव किंवा ‘अमृत सरोवर’ निर्माण करणे यांचा समावेश आहे.