चंदिगढ महापौर निवडीवर ओढले ताशेरे
सकृतदर्शनी पाहिलं तर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेत खाडाखोड केल्याचं दिसत आहे. ही लोकशाहीची चेष्टा आहे. यामुळे आम्ही चकीत झालो आहोत. ही लोकशाहीची हत्याच आहे.हे शब्द आहेत भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे. चंडीगड महापौर निवडणुकीमध्ये कथितपणे मतदान पत्रिकांशी झालेली छेडछाड ही लोकशाहीची थट्टा आणि लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांमध्ये देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी ताशेरे ओढत आपली नाराजी व्यक्त केली.
सदर प्रकरणाची व्हिडीओ क्लिप जपून ठेवण्याचे निर्देश देतानाच कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
कोणी काय म्हटलं?
सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ‘आप’च्या नगरसेवकांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. या खंडपीठामध्ये न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्राही होते. मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ याचिकाकर्त्या नगरसेवकांनी कोर्टासमोर सादर केला. भाजपा उमेदवाराची निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आणि त्याने पक्षपाताच्या माध्यमातून काँग्रेस-आपची ८ मतं बाद ठरवली, असा आरोप याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. तर दुसरीकडे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी, या व्हिडीओमुळे केवळ चित्राची एकच बाजू दिसत असून सर्व कागदपत्रे तपासून प्रकरण सर्वांगाने तपासावे, अशी विनंती कोर्टाला केली.
लोकशाहीची हत्या हऊ देणार नाही
आपच्या याचिकाकर्त्यांनी सादर केलेला निवडणुक प्रक्रियेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर, “निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेमध्ये खाडाखोड केल्याचे दिसत आहे,” असं निरिक्षण कोर्टाने व्हिडीओ पाहिल्यावर नोंदवलं. ‘ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही यामुळे स्तंभित झालो आहोत. लोकशाहीची अशाप्रकारे हत्या आम्ही होऊ देणार नाही,’ अशा शब्दांमध्ये सरन्यायाधिशांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सुनावलं. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडे तातडीने महानिबंधकांकडे या निवडणुकीसंदर्भातील सर्व कागदपत्रं, व्हिडीओ क्लिप्स आणि मतपत्रिका जमा कराव्यात असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
सरन्यायाधीश संतापले
मतदान घेण्याची ही अशी पद्धत असते का? ही लोकशाहीची थट्टा आहे. फरारी असल्याप्रमाणे ते (निवडणूक अधिकारी) का पळत आहेत? या माणसावर गुन्हा दाखल करुन खटला चालवला पाहिजे, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली.
आपने व्यक्त केलं समाधान
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं आम आदमी पार्टीने स्वागत केलं आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी न्यायालयाने व्हिडीओ आणि कागदपत्रं संभाळून ठेवण्याचे आदेश दिलेत. अशा निर्णयांमुळेच न्याययंत्रणेवरील आमचा विश्वास अढळ राहिला आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवली. काँग्रेस-आप आघाडीला २० मतं मिळाली होती. भाजपाला १६ मतं मिळाली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्याने ८ मतं बाद ठरवली. आपल्या लोकशाहीमध्ये असा प्रकार कधीच घडला नव्हता, असंही पाठक यांनी सांगितलं.