तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा निरोप समारंभ संपन्न
सातारा प्रतिनिधी हेमंत पाटील
सातारा – दिनांक ८ ऑगस्ट सातारा जिल्हाधिकारी पदी नुकतेच रुजु झालेले रुचेश जयवंशी यांचे स्वागत व तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा निरोप समारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
स्वराज्याची राजधानी सातारामध्ये काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, स्वराज्याच्या राजधानीत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुरु केलेले काम यापुढेही सुरु ठेवणार आहे. शासनाच्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर राहणार आहे. पर्यटनाबरोबरच दिव्यांगांसाठीही उल्लेखनीय काम करण्याचा प्रयत्न राहील. ज्या प्रमाणे शेखर सिंह यांना प्रशासकीय कामात सहकार्य केले त्याच प्रमाणे या पुढेही सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सातारकरांनी केलेले प्रेम नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले. सातारा जिल्ह्यात केलेले काम तसेच विशेषत: कोरोना संसर्गाच्या काळात केलेले काम नेहमीच माझ्या स्मरणात राहिल. कोरोना संकटाच्या काळात विविध निर्बंधांचे आदेश काढण्यात आले. या आदेशाचे नेहमीच पालन करुन जनतेने सहकार्य केले. सातारकरांनी केलेले प्रेम नेहमीच माझ्या कामात प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
कोरोना संकटाच्या काळात पोलीस, महसूल, आरोग्य विभागासह सर्व विभागांनी समन्वयाने काम केले. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. गेल्या वर्षी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आपत्ती निर्माण झाली होती. या आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने संपर्कहिन गावातील रस्त्यांची दुरुस्ती करुन वाहतूक सुरळीत केली. तसेच ज्या गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता त्या गावांचा विद्युत विभागाने युद्धपातळीवर काम करुन विद्युत पुरवठा सुरळीत केला.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणीसह इतर ठिकाणी पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. पर्यटन विकासामुळे स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. पर्यटन क्षेत्रात सातारचे नवीन जिल्हाधिकारी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करुन सातारा जिल्ह्यात केलेले काम नेहमीच पुढील प्रशासकीय काम करीत असताना उपयोगी ठरेल, असेही तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये विविध शासकीय विभाग व संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचाही सहपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.