सणसवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेला ९ वी ते १२ वी पर्यंत शिक्षणाची परवानगी बाबत ग्रामस्थ,व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह आमदार अशोक पवार यांनी याबाबत सातत्याने पथाउरवा करत शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला १२ पर्यंत परवानगी मिळाली आहे.
शिरूर तालुक्यातील प्राथमिक शाळा इयत्ता बारावीपर्यंत करा तसेच त्याची सुरुवात सणसवाडी (ता. शिरूर) येथील वसेवाडी जिल्हा परिषद शाळेतून करा, अशी आग्रही मागणी या शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा विषय थेट विधानसभेत उपस्थित करून ‘शिरूर तालुका एज्युकेशन हब’ म्हणून विकसित करण्याची ग्वाहीही आमदार अशोक पवार यांनी गोसावी यांच्यासह नागरिकांना दिली होती.
नाविन्यपुर्ण उपक्रमाअंतर्गत सक्षम प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणाला परवानगी देण्याबाबत आमदार अशोक पवार यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून याबाबतचा अध्यादेशही शासनाने कालच काढला आहे. त्यानुसार स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शाळेला प्राथमिक शाळेस जोडुन माध्यमिक ते उच्च माध्यमिक दर्जावाढ परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता शिरुर तालुक्यातील वसेवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना प्रथमच नववी ते १२ वी पर्यंत शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
“जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्यांची मुले शिकत असल्याने जिल्हा परिषद शाळेत इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणाला परवानगी द्यावी, यासाठी मुख्याध्यापक संतोष गोसावी तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये बारावीपर्यंत शिक्षण द्या, तसेच माध्यमिक शाळांमध्ये किमान ३ किलोमीटर अंतर नको, यासाठी मी सरकारदरबारी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. आता सामान्य कुटूंबांतील विद्यार्थ्यांनाही जिल्हा परिषद शाळांमध्ये १२ वी पर्यंतच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यापुढेही जिल्हा परिषदेत सुलभ व दर्जेदार शिक्षणासाठी माझा पाठपुरावा सुरु राहील.” – आमदार ॲड. अशोक पवार, शिरुर-हवेली.