कोरेगाव भिमा -सणसवाडी , शिरुर तालुक्यातील पहिली उद्योगनगरी असलेल्या सणसवाडी (ता.शिरूर) येथे बिनदिक्कतपणे पाच-पाच मजली इमारतींची कामे सुरू असून ना स्थानिक ग्रामपंचायतीचे नियंत्रण ना पीएमआरडीएचे लक्ष. पर्यायाने संपूर्ण सणसवाडीत बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून बांधकाम करणारांचीही मुजोरी वाढलेली आहे. याबाबत थेटपणे कुणीही बोलायला येत नसल्याने येत्या काही दिवसात संपूर्ण गावची बजबजपुरी होणार हे नक्की.
तब्बल २५० ते ३०० कंपन्यांमुळे सणसवाडीत नागरी वसाहतीही नव्याने वसत आहेत. यात स्थानिक कंपन्यांमधील अधिकारी, अभियंते, कामगार आदींचा समावेश असून ही मंडळी मिळेल तिथे गुंठा-अर्धा गुंठा घेवून कुठलेही सुविधा क्षेत्र (अॅमेनिटी स्पेस) न सोडता बांधकाम करीत आहे. पर्यायाने या भागात आग, भूकंप वा इमारत पडझडीचे प्रकार वा अपघात झाल्यास मोठी जिवीतहानी होण्याचा संभव आहे. या शिवाय स्थानिक ग्रामपंचायतील दैनंदिन सोयिसुविधा पुरविणेही जटील होत चालले आहे. अर्थात या सर्व बांधकामांच्या बेकायदा ग्रामपंचायत नोंदी हा मोठा त्रासही ग्रामपंचायतींना सुरू आहे. याबाबत नुकतीच चेअरमन वस्ती या एकाच भागाला नुकतीच भेट दिली असता येथे तब्बल १० ते १२ इमारतींची बांधकामे अशी सुरू आहेत की, त्या सर्व चार ते पाच मजल्यांच्या आहेत. स्थानिकांशी चर्चा केली असता यातील एकानेही कुठलीच परवानगी न काढता ही बांधकामे सुरू केली असून महावितरणनेही या बांधकामांसाठी थेटपणे वीजजोड दिले आहेत. याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीतील प्रशासन व सरपंच-उपसरपंच व पदाधिकारी कानावर हात ठेवत असल्याने सणवाडीचा प्रवास बजबजपुरीच्या दिशेने सुरू असून संपूर्ण गावात बकालपणा हमखास वाढणार अशी स्थिती आहे.
तक्रारी येतील त्यांचेवर हमखास कारवाई होणार : पीएमआरडी. सणसवाडीतील बेकायदा बांधकामांबाबत तक्रारी आमचेकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार संबंधितांना तात्काळ नोटीसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. पुढील काही दिवसात आलेल्या तक्रारींची शहानिशा आणि संबंधितांचे म्हणणे ऐकून बांधकामांवरील थेट कारवाई आम्ही करणार आहोत. याबाबत स्थानिकांनी तसेच स्थानिक ग्रामपंचायतीनेही आमचेकडे तक्रारी कराव्यात कारवाई हमखास केली जाईल हे नक्की. – बजरंग चौगुले (तहसिलदार, अतिक्रमण कारवाई विभाग, पीएमआरडीए, पुणे)