कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील एका प्लॉटींगमधील ३५० सिमेंट पोल जेसीबी आणि ट्रॅक्टरद्वारे भर दिवसा चोरुन नेत दमदाटी, शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन सणसवाडी (ता.शिरूर) येथील नवनाथ विश्वनाथ हरगुडे याचेसह अन्य दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिनही आरोपी फरार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणी उद्योजक राजेश भुजबळ यांच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी. २७ मार्च रोजी सणसवाडी येथील राजेश रवींद्र भुजबळ यांना सराटेवस्तीतील आपल्या गट नं. ३३७/२ मधील प्लॉटींगमधील सिमेंटचे पोल दोन जेसीबी (एमएच १२- जेके-७६५ व एम एच १२ – एलवाय-५९७०) व एक डंपर (एमएच १२ – ७४७६) यांच्या सहाय्याने कुणीतरी पाडीत असून ते ट्रॅक्टरने वाहून नेत असल्याची माहिती समजली. यावरुन ते घटनास्थळी जाताच तिथे नवनाथ विश्वनाथ हरगुडे, महादेव दशरथ हरगुडे, सागर तुकाराम हरगुडे (तिघेही रा.सणसवाडी, ता.शिरूर) हे तिथे उपस्थित राहून वरील प्रकार दोन जेसीबी, एक डंपर व एक ट्रॅक्टरच्या सहाय्याने
करीत असल्याचे निदर्शनास आले. यावरुन राजेश भुजबळ यांनी वरील तिघांना हटकले असता तिघांनीही भुजबळ यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. यावेळी सुमारे ३५० सिमेंट पोल वरील तिघांनी चोरुन नेल्याने तशी तक्रार भुजबळ यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली.
दरम्यान अशाच पध्दतीने पाच महिन्यांपूर्वी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी वरील तिघांनी भुजबळ यांच्या याच क्षेत्रातील शेती कंपाऊंडचे नुकसान करुन धमकीही दिली होती. तशी तक्रार यापूर्वी शिक्रापूर पोलिसांकडे दाखल आहे. याच पार्श्वभूमिवर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी सदर प्रकरण गांभिर्याने घेत वरील तिघांसह दोन अज्ञात जेसीबी चालक, एक डंपर व एक ट्रॅक्टर चालक यांचेवर चोरीसह दमदाटी, बेकायदेशीर ऐवज नेण्याचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी वरील सातही जण फरार असून शिक्रापूर पोलिसांकडून लवकर अटक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.