- संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधान प्रास्ताविकेचे वाटप
पिंपरी – दिनांक २६ नोव्हेंबर
विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या खंडप्राय भारत देशाला संविधानाने एकसंध ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी या भारतीयांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या आहेत. कोणत्याही देशाने कितीही वक्रदृष्टी ठेवली तरी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत. तोपर्यंत हा देश एकसंध राहील, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतिश काळे यांनी केले.
देशात विविध जात धर्माचे लोक एकत्रित नांदत आहेत. हे सर्व एकेमकांशी प्रेमाचे सलोख्याचे संबंध ठेऊन आहेत. अनेकदा जातीय द्वेष पसरविण्याचे काम काहींनी केले आहे. मात्र त्यांचा हा हेतू हाणून पाडण्याची ताकद संविधानामध्ये असून देशातील एकता, बंधुता टिकविण्यासाठी संविधानाचा जागर सर्वत्र होणे गरजेचे असल्याचे काळे यांनी सांगितले.
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानाच्या प्रास्ताविक प्रतचे सामुहिक वाचन केले. या वेळी मार्गदर्शन करताना सतिश काळे बोलत होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गजधने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे येणाऱ्या नागरिकांना वाटप करण्यात आले.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतिश काळे, उपाध्यक्ष रविंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे, सचिव मंगेश चव्हाण, संघटक राजेंद्र पवार, बिरसा मुंडा संघटनेचे पांडुरंग परचंडराव, सचिन जाधव, योगेश पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.