निसर्गरम्य परिसर ,खेळाचे साहित्य यामुळे लहान बालक, कुटुंबीयांसह भाविकांची गर्दी
अचानक बरसणाऱ्या श्रावण सरींमुळे भाविकांना अनोखा आनंद
कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र नरेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
श्रावणातील दुसरा सोमवार असल्यामुळे महीलाभगिनी ,लहान बालके,कामगार व पंचक्रोशीतील नागरिकांनी श्री नरेश्वर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. निसर्गरम्य परिसरातील डोंगरावरील देखणे ,विलोभनीय शिवंमंदिर आणि त्यात बरसणाऱ्या श्रावणधारा यामुळे दर्शनासाठी आलेल्या शंभू भक्तांना एक अनोखा आनंद अनुभवायला मिळाला. श्री क्षेत्र नरेश्वर येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येत असून येथे विकसित करण्यात आलेल्या गार्डनमध्ये लहान मुलांना खेळाचे साहित्य असल्याने मुलेही मनसोक्त खेळत रमत होती त्यामुळे येथे भाविक कुटुंबासाठी रमले होते. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी येथे मोठ्या प्रमाणात हार फुले, बेलपत्र व इतर पूजेचे साहित्य ,लहान मुलांच्या खेळण्याचे , उपवासाचे फराळ विक्रेते स्टॉल लावण्यात आल्याने येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
श्रावणी सोमवार निमित्त येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते.सकाळ पासून श्रींचा अभिषेक व पूजा करण्यात आली.दर्शन रांगा लावून सर्वांना दर्शन मिळण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी दानशुरांनी मदत करावी. – महेश सातभाई, पुजारी काका