ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास होणार सुखकर
निर्वी – निर्वी ( ता. शिरूर ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गंगोत्री असणारी लालपरी , शेतकरी व कामगारांचा जिव्हाळ्याचा विषय असलेली एस टी अखेर सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ग्रामीण भगतील नागरिकांची लाईफ लाईन असलेली लालपरी शेतकरी,विद्यार्थीवर्ग व कामगारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली प्रवाशांचा प्रवास सुखकर करत रात्री मुक्काम करत विद्यार्थ्यांना,कामगारांना वेळेवर सोडायची पण कोरोनामुळे लॉकडाऊन काळ व त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हा मुक्काम बंद झाला होता.
ही सेवा बंद झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिरूर येथे जावे लागत असल्याने तांदळी ते निर्वी असा सकाळचा प्रवास व महाविद्यालयात पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता राष्ट्रीय मानव अधिकार शिरूर शहर अध्यक्ष शकील मनियार यांनी संघटनेच्या मार्फत पाठपुरावा केला तर ग्रामपंचायत मासिक ठराव मंजूर झाल्यानंतर हा ठराव आगार प्रमुख यांच्याकडे देण्यात आला होता. कोणताही विलंब न करता केलेल्या मागणीस प्रतिसाद देऊन बस सेवा पुर्वरत सुरु करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बस चालक घावटे व वाहक रासकर यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांनी आगार प्रमुख सुरेश शिर्के, लेखाकर इरशाद मणियार, सहाय्यक वा.अ. भैरवनाथ दळवी, वाहतूक निरीक्षक लोहकरे, यांचे विशेष आभार मानले यावेळी प्रदीप साळुंखे, संतोष सोनवणे,योगेश सोनवणे, बबन वाबळे, लक्ष्मण शहाणे, ज्ञानेश्वर शहाणे,पंडित आखुटे, मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण शिरूर शहर अध्यक्ष शकील मनियार,सरचिटणीस एकनाथ थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी लाल परी सज्ज झाल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना दिलासा मिळाला.