पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती . आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांनी शिरूर करांना पाण्याचे आवर्तन मिळणार आहे.
कोरेगाव भीमा – शिरूरची दुष्काळसदृश परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी तत्काळ दखल घेऊन शिरुरकरांसाठी पाणी आवर्तन पुढील दोन दिवसांत म्हणजेच बुधवारी (ता. २६) रोजी सुरू होईल, अशी ग्वाही आमदार अशोक पवार यांनी दिली.शेती, जनावरे व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने शिरूर करांच्या तोंडचे पाणी पळाले होते.त्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत असून सध्याच्या पाणी टंचाईला सामोरे कसे जायचे हा सर्वांसमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता.
शिक्रापूर, तळेगाव ढमढेरेसह शिरूरच्या बहुतेक सर्वच मोठ्या गावांमध्ये पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणी टंचाई झाली आहे. काही गावांमध्ये टँकर सुरू करायचे तर कुठून पाणी घ्यायचे हा ही प्रश्न बनला आहे.याच पार्श्वभूमिवर आमदार अशोक पवार यांनी चासकमानचे पाणी तत्काळ सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरुरची सद्यःस्थिती सांगितली.
या शिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना स्वतंत्र निवेदन देवून पुणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ सूचित करण्याबाबत विनंती केली असता, आपण तत्काळ पाणी सोडण्याच्या आदेशाची कार्यवाही करीत असल्याची ग्वाही सोमवारी रात्री उशिरा दिली. पर्यायाने बुधवारी (ता. २६) चासकमानमधून शिरुरसाठी आवर्तन सोडले जाईल, अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली.