पुणे – साहेबांचे काम करतो सांगून लाच मागणाऱ्या इसमाला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथे ही कारवाई केली असून समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू.या प्रकरणी ६७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली असून शंकर शिवाजी क्षिरसागर (वय ३२ वर्ष,पुणे) इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे आपली शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी तसेच अन्न धान्य पुरवठा चालू करण्यासाठी जुनी जिल्हा परिषद कार्यालय येथे पुरवठा अधिकारी यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी कार्यालय ठिकाणी असलेल्या शंकर या खाजगी इसम याने तक्रारदार यांना मी साहेबांचे काम करतो व तुमचे रेशनकार्ड काढून देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडे ४५०० रुपयांची लाच मागितली असता यापैकी तडजोड़ी अंती २८०० रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव, म.पो.ना.वनिता गोरे ,पोलिस शिपाई सौरभ महाशब्दे, चालक पो.शि.कदम, ला.प्र.वि. पुणे यांच्या पथकाने केली.
पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हंटले आजे, की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.