जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडीने राखली यशाची परंपरा कायम
कोरेगाव भीमा – वाबळेवाडी (ता.शिरूर)
महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीतील तब्बल सहा विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय प्रवेशासाठी निवड झाली असून शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. यात आदित्य चिंतामण परदेशी, पुनम संतोष साठे, करण तुकाराम सातपुते यांची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली असून आता प्रतीक्षा यादीत वसुधा महेंद्र तांबे, स्वराली गोरक काळे, रूद्र रामदास यादव या आणखी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे मार्गदर्शक शिक्षक गोरख काळे व प्रतिभा पुंडे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडीने ३० एप्रिल २०२२ रोजी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत शाळेचे सहा विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यात आदित्य चिंतामण परदेशी, पुनम संतोष साठे, करण तुकाराम सातपुते यांची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली. त्यानंतर प्रतीक्षा यादीत याच शाळेतील आणखी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात एकूण सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने शाळेने नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण सीबीएससी मध्ये अगदी मोफत होणार आहे. सदर परीक्षेसाठी कोरोनाची वातावरण असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या गोरख काळे आणि प्रतिभा पुंडे यांनी या मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
निकाल जाहीर होताच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.