तळेगाव ढमढेरे – वाबळेवाडी शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या केंद्र पातळीवरील स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या स्वलिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांनी आजपर्यंत पन्नास पुस्तके लिहिलेली आहेत. वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सचिन बेंडभर यांनी प्रेरणा दिल्याने शाळेतील तब्बल ८५ बालकवींनी स्वलिखित कविता तयार केल्या आहेत. या बाल चिमुकल्यांच्या कविता परीसस्पर्श या पुस्तकाच्या माध्यमातून सचिन बेंडभर यांनी प्रकाशित केल्याने बाल चमू आनंदी झाले आहेत.
यशोदीप पब्लिकेशन्सने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांनी विषयाला अनुरूप मुखपृष्ठ रेखाटले आहे. परीसस्पर्श या पुस्तकाचे संपादक सचिन बेंडभर आहेत. पुस्तकाची प्रस्तावना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, पाठ्यपुस्तकातील कवी आणि तहसीलदार आबा महाजन यांनी दिली आहे. तर प्रयोगशील शिक्षक, महाराष्ट्र शासन सल्लागार समिती सदस्य, दत्तात्रय वारे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
वाबळेवाडीच्या मुलांचा कविता संग्रह प्रकाशित होणे हा शाळेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण आहे, – दत्तात्रय वारे
या पुस्तकाच्या निर्मितीसाठी रुपाली अवचरे आणि निखिल लंभाते तसेच मुद्रक हेमंत मोरे यांनी मेहनत घेतली आहे. वर्ष २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या परीसस्पर्श पुस्तकाची सर्वत्र दखल घेतली जात असल्याने साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
वाबळेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे साहित्य क्षेत्रातील उत्तुंग यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन केले आहे.