वाडेबोल्हाई प्रतिनिधी
वाडेबोल्हाई (ता.शिरूर) येथील वाडेगावामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पारायण सोहळा व भजन किर्तन असे कार्यक्रम ३ दिवस पार पडले.
यावेळी स्वामी समर्थांच्या पादुकांची मिरवणूक प्रसंगी स्वामींच्या रथाची आकर्षक सजावट आणि पारंपारिक टाळ,मृदुंग वाद्यांचा निनाद तर वारकरी बांधवांनी गायलेले अभंग अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आल्याने सर्व वातावरण भक्तिमय होऊन स्वामिमय झाले होते.
महिलांनी व लहान मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता.ठिकठिकाणी आकर्षक व रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. स्वामी समर्थांच्या नाम घोषाने वातावरण भारावून गेले होते. टाळ, मृदुंगाच्या तालावर महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता.
या प्रसंगी स्वामी समर्थ ट्रस्ट वाडेबोल्हाई अध्यक्ष संतोष गायकवाड , नितीन गावडे , सरपंच वैशाली केसवड, सदस्य कुशाबा गावडे, संदीप केसवड , प्रविण गावडे,स्वामी भक्त, वारकरी, भाविक भक्त व वाडे बोल्हाई ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.