छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी तनिषा बोरमनिकर ही विद्यार्थिनी आहे.या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत.राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
तनिषाला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, पाली आणि अर्थशास्त्र विषयात शंभरपैकी शंभर गुण आहेत. तर इंग्रजी विषयात ८९ गुण, बुक कीपिंग ॲण्ड अकाउंटन्सी विषयात ९५ गुण तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस विषयात ९८ गुण आहेत. तनिषा ही बुद्धीबळ खेळाडू असून तिने सात वर्षाखालील, नऊ वर्षाखालील, ११ वर्षाखालील वयोगटासाठी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विविध पदके मिळविली आहेत. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद आहे. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे
ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. १६ वर्षाखालील वयोगटासाठी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सब ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेत तिने ‘नॅशनल चॅम्पियन’चा मान मिळविला आहे. बुद्धिबळाच्या खेळात कामगिरी करणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी केली आहे.
तनिषाचे वडील सागर म्हणाले, ”वयाच्या सहाव्या वर्षापासून तनिषा बुद्धीबळ खेळत आहे. लहानपणापासूनच तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अकरावीत असतानाही ती राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. बारावीत असतानाही तिने विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे.”