“दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार” – कु. सार्थक माणिक सातव
कोरेगाव भिमा – वाघोली (ता. हवेली) येथे स्वर्गीय माणिकराव दादा सातव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कुमार सार्थक माणिकराव सातव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरास २५ ते ३० हजार नागरिकांनी भेट दिली असून, त्यापैकी २२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्णांसाठी विशेषतः लॅब टेस्टिंग, ईसीजी, एक्स-रे यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या, आणि १०० रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेचा ५० लाखांपर्यंत लाभ मिळणार आहे.
यावेळी पत्नी निर्मला माणिकराव सातव पाटील, कन्या डॉ सारीका गौतम बहिरट, सुरेखा तुषार निम्हण, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील, मिनाक्षी सातव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील,माजी सरपंच जयश्री सातव पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद ,तसेच अनेक पक्षांचे नेते,कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरोग्य शिबिरातील उल्लेखनीय सेवा – नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, मेंदूरोग, मूत्ररोग, बालरोग, नाक-कान-घसा, स्त्रीरोग, दंतरोग, जनरल मेडिसिनआदी आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली गेली.
या आरोग्य शिबिरात अनेक उल्लेखनीय सेवा देण्यात आल्या. तपासण्या आणि औषधोपचाराबरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. यामुळे सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – या आरोग्य शिबिरामध्ये येरवडा, विश्रांतवाडी, वाघोली, तसेच पूर्व हवेलीतील अनेक गावांमधून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. अनेकांनी या शिबिराला ‘वरदान’ ठरल्याचे म्हणत, माणिक दादा सातव पाटील यांच्या समाजसेवेसाठी आदर व्यक्त केला. शिबिरातील सुव्यवस्था आणि उत्कृष्ट नियोजनामुळे नागरिकांना सेवा मिळण्यात कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही, आणि सर्व सेवा अत्यंत सुव्यवस्थित नम्रपद्धतीने देण्यात आल्या.
समाजोपयोगी शिबिराची यशस्वी अंमलबजावणी – आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णालयांमध्ये बीएसडीटी आयुर्वेदिक महाविद्यालय वाघोली, डीवाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, काशीबाई नवले हॉस्पिटल, अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, कमला नेहरू हॉस्पिटल, ससून रुग्णालय, अजिंक्य डीवाय पाटील मेंटल मेडिकल कॉलेज, नोबल हॉस्पिटल हडपसर, संचतेती हॉस्पिटल पुणे, मणिपाल हॉस्पिटल खराडी, एम्स हॉस्पिटल औंध या प्रमुख रुग्णालयांचा समावेश होता. या शिबिरासाठी संबंधित रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
माणिक दादा सातव पाटील यांचा समाजसेवेचा वारसा – स्वर्गीय माणिकराव दादा सातव पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेला समर्पित केले. त्यांच्या कार्यातून अनेक गरजू आणि दुर्बल लोकांना मदत मिळाली आहे. त्यांचा हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे कार्य कु. सार्थक माणिकराव सातव पाटील करीत आहेत. माणिक दादांच्या प्रेरणेने ते दर महिन्याला अन्नदान तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत.
दादांच्या आठवणींनी पाणावले डोळे – शिबिराला आलेल्या नागरिकांनी माणिक दादा सातव पाटील यांच्या आठवणींनी भावुक झाले. “दादांनी नेहमीच गरजू आणि गरीब लोकांच्या मदतीला धावून येण्याचे काम करत त्यांचे अश्रू पुसले. त्यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. दादांच्या कर्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत, आणि यापुढेही घडत राहतील, अशी भावना व्यक्त करत मनमिळावू स्वभाव व दिलदार व्यक्तीमत्व असलेल्या दादांच्या माणुसकीच्या, सहदयतेच्या आठवणी अनेकांच्या हृदयात दाटून आल्याने अनेकांचे डोळे पाणावले.
दादांचा समाज सेवेचा वारसा पुढे घेऊन जात असून समाजोपयोगी भरीव व इतरांच्या आयुष्यातील दुःख ,वेदना ,त्रास कमी करणारे व इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करण्याचे संस्कार दादांनी केले आहेत तोच वारसा आणि वसा यापुढे घेऊन जाणार असून दरवर्षी असाच समाजोपयोगी व लोककल्याणकारी, लोकसेवेचा उपक्रम राबवणार आहे. – कु.सार्थक माणिक दादा सातव पाटील.