शिक्रापूर ता.०५
नऊ वर्षात घोडगंगाचे विस्तारीकरण नाही अन व्यंकटेशकृपा (vyankatesh shugar factory) मात्र तिप्पट गाळप क्षमतेचा झालाय. याच गतीने हळू हळू घोडगंगा कारखाना बंद होईल अन व्यंकटेशकृपा कारखान्याची मक्तेदारी सुरू होणार असल्याचा धोका शेतक-यांच्या लक्षात आलेला नाही. तरीही ज्या मोजक्या शेतक-यांनी माझ्या भूमिकेचा निषेध केलाय ते व्यंकटेशकृपा कारखान्याचे कंत्राट लाभार्थी असल्याचा आरोप करीत भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे ( sanjay pachange) यांनी व्यंकटेशने गुजरातसारखा ५ हजार रुपये प्रतीटन भाव ऊसाला देण्याची मागणी आजच्या पत्रकार परिषदेत केली.
२ तारखेपासून संजय पाचंगे व्यंकटेशकृपा साखर कारखान्यातील अनियमिततेची काही शासकीय दस्तऐवज दाखवून कारखान्यावर कारवाईची मागणी करीत आहेत. प्रसिध्द झालेल्या ३ तारखेच्या वृत्तावरुन काही ऊस उप्तादक शेतक-यांनी संताप व्यक्त करीत पत्रकार परिषदेत पाचंगे यांचा निषेध करीत अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले. त्यावरच बोलताना पाचंगे यांनी आज सांगितले की, घोडगंगा संपविणे व व्यंकटेश वाढविणे हाच उद्देश तालुक्यातील शेतक-यांच्या लक्षात आलेला नाही. गेल्या नऊ वर्षात घोडगंगा साखर कारखान्याच्या मोठ्या कर्जात आणि व्यंकटेशमात्र कर्जमुक्त होत तिप्पट गाळप क्षमतेचा कसा होतो. हीच गती कायम राहिल्यास व्यंकटेश मोठा होवून घोडगंगा बंद होईल अन व्यंकटेशची मक्तेदारी शेतक-यांच्या जिवावर उठेल. हा धोका टाळण्यासाठीच मी लढाई पुकारली असून अजुनही आमदार अशोक पवार यांनी घोडगंगाचे विस्तारीकरण जाहीर करावे अन व्यंकटेशच्या अनियमिततेबद्दल बोलावे आपण सर्व राजकीय जोडे बाजुला ठेवून विस्तारीकरणासाठी सोबत येवू.
कालच्या संतप्त शेतक-यांमध्ये इस्टेट एजंट, व्यंकटेशला जमिनी विकलेले, ट्रॅक्टर पूरवठादार आणि काही आर्थिक लाभाचे कंत्राटदार यांचाच समावेश होता. माझी लढाई पूराव्यानिशी असते त्यामुळे ज्यांनी माझ्याविरोधात बोललेत त्यांनी व्यंकटेशच्या माहितीची कागदपत्रे कधीही मागावीत मी त्यांना देण्य़ास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान व्यंकटेशचा एवढाच पुळका असेल अन माझ्या उद्योग भूमिकेबद्दल आक्षेप असतील तर कालच्या संतप्त शेतक-यांनी व्यंकटेशने गुजरातमधील कारखान्यांसारखा पाच हजार रुपये प्रतीटनाचा भाव व्यंकटेशने द्यावा म्हणून प्रयत्न करुन माझ्याशी बोलावे.