जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट मुळे भविष्यातील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेला याबाबत कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये कुजबुज
हेमंत पाटील सातारा
कराड – वहागाव (ता. कराड) येथे बुधवारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता व दिशा लक्षात येण्यासाठी दिवंगत भिकु तुकाराम पवार यांचे स्मरणार्थ शरद पवार यांनी बांधलेल्या दिशादर्शक फलकाचे उद्घाटन बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते झाले. दोन्ही नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये भविष्यातील राजकीय दिशा कोणती असेल यावर चर्चा रंगली.राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपचेनेते डॉ. अतुल भोसले यांच्या राजकीय वैरत्वाला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत टर्निंग पॉईंट मिळाला. डॉ. भोसले यांच्या मतीने बाळासाहेबांनी जिल्हा बँक निवडणुकीत मैदान मारले आणि कराड तालुक्याचे राजकारण फिरले या दोघांच्यातील राजकीय प्रेम आताभलतेच बहरू लागले आहे. आता हे राजकारण पुढे आणखी काय काय वळण घेणार? हे पहावे लागेल.
राजकारणात कोण कधी काय दिशा दाखवेल अन कोण कधी कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्येय म्हणून वाहगाव (ता. कराड) येथील दिशादर्शक स्तंभ उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाहावे लागेल. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी एका दिशादर्शक स्तंभाचे उद्घाटन केले खरे पण,तालुक्याच्या राजकारणात आम्ही दोघे एकत्रितच आहोत अशी राजकीय ‘दिशा’च त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिल्याचे बोलले जात आहे.
यावेळी तालुक्यातील दोघांचेही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पण दिशादर्शक स्तंभाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तालुक्यातील आपल्या प्रमुख समर्थकांना या दोघांनी राजकीय दिशाच एक प्रकारे सांगितली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘ दाखवायची दिशा एक आणि जायचं दुसरीकडे’ असंही अनेकजण करतात. इथंही मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता नीट समजावा यासाठी बनवलेल्या दिशादर्शक स्तंभाचे उद्घाटन होते. मात्र कार्यकर्त्यांना वेगळीच दिशा दाखवायची होती हे न कळण्याइतके कार्यकर्ते अडाणी राहिलेले नाहीत. राजकारणात सदा सर्वदा तीच परिस्थिती राहत नसते. कराड तालुक्याच्या राजकीय पटलावरही त्याचा अनुभव आला आहे.