भिगवण मदनवाडी (ता. इंदापूर) येथील शुभम संपत बंडगर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे जलसंपदा विभागामध्ये “सहायक अभियंता” पदी निवड झाली आहे.सन २०२१ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे या परिक्षेचे काही टप्पे उशिराने झाल्याने त्या परीक्षेचा निकाल लांबला होता.
आता तो नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये शुभम बंडगर यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण बालविकास मंदिर बारामती ,महाविद्यालयीन शिक्षण तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे तर इंजिनिअरिंग सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथुन पूर्ण केले आहे.
शुभम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असून त्याने या परीक्षेचा सर्व अभ्यास घरी राहून कोणत्याही क्लासेस शिवाय केला होता. यापुढेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा त्याचा मानस आहे.शुभमचे वडील संपत बंडगर हे शिव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून भिगवण रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आहेत.शुभमच्या आई मीनाताई बंडगर यासुद्धा रोटरीच्या सदस्या असून विविध सामाजिक उपक्रमात अग्रभागी असतात. भिगवण परिसरातील विविध राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक उपक्रमामध्ये उभयतांचे भरीव योगदान असते. शुभमच्या यशाबद्दल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाबद्दल भिगवण आणि परिसरातून शुभमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तक्रारवाडी ग्रामपंचायत ,भिगवण ग्रामपंचायत ,मदनवाडी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.