सचिन बेंडभर यांची आजोळ कविता शिष्यवृत्ती परीक्षेत
कोरेगाव भिमा -, दिनांक २५ नोव्हेंबर
पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील “आजोळ” या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या शिष्यवृत्तीच्या तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. या कवितेला मंथन प्रकाशनाने मानाचे स्थान दिले असून सलग दुसऱ्यांदा त्यांच्या कवितेचा समावेश थेट प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांची एकूण पन्नास पुस्तके प्रकाशित आहेत. कळो निसर्ग मानवा या त्यांच्या कवितेचा समावेश इयत्ता सहावीच्या सुगम भारती या पाठ्यपुस्तकात आहे. आता त्यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील “आजोळ” या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांच्याकडे पाचवीचा वर्ग असून विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती सराव चालू आहे. मंथन प्रकाशनाकडून त्यांनी प्रश्नपत्रिकेचे दहा संच मागवले होते. त्यातील तिसऱ्या संचात गुरुजींना व विद्यार्थ्यांना आजोळ ही कविता अचानक पहायला मिळाल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला. गुरुजींची कविता प्रश्नपत्रिकेत आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या गुरुजींच्याच कवितेचा अभ्यास करताना मुलांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थीच नव्हे तर पालक वर्गातूनही आनंद व समाधान व्यक्त होत आहे. या कवितेला मंथन प्रकाशनाने मानाचे स्थान दिले असून सलग दुसऱ्यांदा त्यांच्या कवितेचा समावेश थेट प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. या आधी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत ज्ञानवंतच्या आठव्या अंकात त्यांच्या “येते जगाया उभारी” या कवितेची निवड करण्यात आली होती.
सचिन बेंडभर यांची आजोळ ही कविता मंथन प्रकाशनाच्या तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत समाविष्ट असल्याने परिसरातील नागरिकांकडून, साहित्य क्षेत्रातून तसेच शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.