पुणे – आगामी लोकसभेच्या निवडणूकीत मी माझा उमेदवार देणार आहे, बारामतीकर असा विचार मनात आणतील की विधानसभेला अजितला मत देऊ आणि लोकसभेला तिकडे मत देऊ, असे अजिबात चालणार नाही, मला मत द्यायचे असेल तर लोकसभा आणि विधानसभेलाही मलाच मत द्या…..
उद्या खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर जर यदाकदाचित मला मिठाचा खडा लागला (खासदार पराभूत झाला) तर आमदारकीच्या बाबतीत मी वेगळा विचार करेन, मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर अजित पवार यांनी आता बारामती लोकसभेसाठी थेट रणशिंग फुंकलं आहे. आज (4 फेब्रुवारी) बारामती दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांमध्ये टीका करतानाच बारामतीसाठी मीच उभा आहे असं समजून मी देणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन केले.
मी केलेल्या विकास कामांची मला जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर या लोकसभेला मी उभा करेन त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहा. गेल्या अनेक वर्षात प्रचंड कष्ट केल्यानंतर जर माझ्या शब्दाला साथ मिळाली नाही तर मी तरी हे सगळे कशासाठी करु…. असा सवाल विचारत मी हाच वेळ माझ्या व्यवसायासाठी देऊ केला तर मी हेलिकॉप्टर विमानातून फिरेल. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मी व्यवसाय पाहिला तर माझा दावा आहे, मी जे काम करतो ते कोणीच मायेचा लाल करु शकत नाही.
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल,भावनिक करतील पण भावनिक न होता बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने कोण उमेदवार विकासाचे प्रकल्प राबवू शकेल, याचा विचार करून बारामतीकरांनी मतदानाचा निर्णय घ्यावा. नुसतेच शेवटची निवडणूक म्हणतात पण शेवटची निवडणूक केव्हा होईल, हेच समजत नाही, कोणी कितीही दावा केला तरी, कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणतील, बारामतीकरांना ठरवायचे आहे, कामाच्या पाठीशी उभे राहायचे की भावनिक मुद्याला पाठिंबा द्यायचा आहे, बारामतीच्या विकासाची गती कायम ठेवायची की त्याला खिळ घालायची, याचा निर्णय बारामतीकरांनीच घ्यायचा असे अजित पवार म्हणाले.
बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते. बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने सुशील सोमाणी यांनी बारामतीचे सर्व व्यापारी अजित पवार यांच्या पाठीशी असून त्यांचा पाठिंबा जाहिर केला.
अजित पवार म्हणाले, कदाचित तुम्हाला कुणी भावनिक बनविण्याचा प्रयत्न करतील, तिकडे अजितला द्या इकडे आम्हाला द्या, असे सांगितले जाईल पण अजितचे म्हणणे असे आहे की लोकसभा आणि विधानसभा दोन्हीकडे अजित पवार यांच्या विचाराच्या उमेदवारालाच तुम्ही निवडून द्यायचे आहे.
तिस-यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच संधी द्यावे असेच आहे. त्यांना दूरदृष्टी आहे, देशाचा नावलौकीक त्यांनी देशभरात वाढविला आहे. बारामतीत विकासकामे होतात कारण सरकारमध्ये अजित पवार आहेत, म्हणून होतात, ही काही जादूची कांडी नाही, आपण व्यावहारिकच बोलले पाहिजे, माझ्या विचाराचा खासदार दिल्लीत गेला तर मी नरेंद्र मोदी व अमित शहांना सांगू शकतो.
या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या विचाराचा खासदार निवडून दिला आहे, त्यामुळे आमची कामे झाली पाहिजेत, असा आग्रह मी करु शकतो, त्यांनी नुसते हो म्हटले तरी कोट्यवधींची कामे मार्गी लागतात, सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्यानंतर फरक पडतो, त्या मुळे केंद्राच्या योजना मार्गी लावता येतात. त्यामुळे कोणाच्या पाठीशी उभे राहायचे याचा निर्णय बारामतीकरांनी घ्यायचा आहे.