सिंहगड पोलिसांनी तातडीने गोळीबार करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
पुणे – पुण्यातील भूमकर चौकात एक धक्कादायक घटना घडली असून एकाने माचिस दिली नाही म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना पहाटे सिहंगड रस्त्यावरील भुमकर चौकात २.३० च्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणाच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.
माचिस आहे का ? अशी विचारणा केल्याच्या कारणावरुन वाद घालून पिस्तुल मधून गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूमकर चौक परिसरात घडली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर सिंहगड पोलिसांनी तपास करुन काही तासात दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी बनावटी चे पिस्टल जप्त केले आहे.
गणेश गायकवाड (रा.वारजे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ब्रह्मदेव निवृत्ती कांबळे (वय-३१), गोपाळ पांडुरंग सुरवसे (वय-३० दोघे सध्या रा. कंट्रोल चौक, औदुंबर सोसायटी, नऱ्हे मुळ रा. मु.पो. शिरसल ता. औसा जि. लातुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गणेश रात्री एक वाजता दारु घेण्यासाठी नवले ब्रिज येथे चैतन्य बार ठिकाणी आला होता. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपीही आले होते. गणेश याने आरोपींकडे माचीस आहे का? अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी तेथून दुचाकीवरुन निघून गेले. गणेश व त्याच्या मित्राने आरोपींचा पाठलाग केला. दोनच्या सुमारास भुमकर चौकातील एका स्वीट होम जवळ आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रावर गोळीबार केला. यात गायकवाड याच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या. आरोपींचा तपास करत असताना आरोपींची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी कांबळे व सुरवसे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्टल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे राघवेंद्रसिंह क्षीरसागर करीत आहेत.