पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची घटना
सासवड (ता. पुरंदर) येथील स्ट्रॉग रुममधून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेले. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची भारत निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत या प्रकरणात पुरंदरचे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी), तहसीलदार अणि उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्राथमिक तपासणी झालेल्या १० टक्के ईव्हीएम मशिनस प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशिन्स उपविभागीय अधिकारी यांच्या अखत्यारितीत गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवून सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आदेश निवडणूक अयोगाने वेळोवेळी दिलेले आहेत. तथापी या आदेशाचे पालन न झाल्याने ५ फेब्रुवारी रोजी सासवड येथून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीस गेल्याचा गैरप्रकार समोर आला होता.
ईव्हीएम मशीन चोरीप्रकरणी चौकशी समिती स्थापन – राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कंट्रोल युनिट चोरीला गेल्याच्या घटनेची चौकशी करण्याकरिता समिती स्थापन केली आहे. यासमितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त तर सदस्य कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक हे असणार आहे. यांनी ईव्हीएम चोरीच्या घटनेची तात्काळ सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल स्वयंस्पष्ट शिफारशींसह सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली होती. संबंधित घटना ही सोमवारी (5 फेब्रुवारी) समोर आली होती. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या होत्या. पण दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँगरूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं.
या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम मशीन चोरी गेल्याची माहिती समोर आली. यानंतर तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती. सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, फिंगरप्रिंट एक्सपर्टची टीम, एलसीबीची टीम असे पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. तसेच एका पोलीस अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी तीन बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.