सणसवाडी (ता.शिरूर) येथील जयअंबीका कलाकेंद्रातील नृत्य फडाच्या मालकीन वैशाली समसापुरकर आणि पार्टीने अकलुज लावणी महोत्सवात यावर्षी पहिला क्रमांक पटकावताना गोवा राज्यातील मानाचा समजला जाणारा भास्कर आवार्ड स्विकारला. विशेष म्हणजे वैशाली यांच्या ’मला म्हणत्यात पुण्याची मैना..’ या लावणीतील अदाकारीने माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित तमाम गोवेकर घायाळ झाले आणि महाराष्ट्रातील लावणीचे कौतुकही झाले.
येथील जय अंबीका कलाकेंद्रातील नृत्यांगणा वैशाली समसापुरकर यांनी सन २०१५ मध्ये अकलुज लावणी महोत्सवात दूसरा क्रमांक पटकावला होता. पुढील काळात सन २०१८ पासून अकलुज लावणी महोत्सव बंद झाला तो यावर्षी सन २०२३-२४ मध्येच सुरू झाला. यावर्षी मात्र या महोत्सवातील पहिला क्रमांक वैशाली समसापुरकर यांनी तीनच महिन्यांपूर्वी पटकावला. दरम्यान वैशाली यांच्या गुरुस्थानी असलेले नृत्यदिग्दर्शक योगेश देशमुख आणि जय अंबीका कलाकेंद्राच्या मार्गदर्शिका सुरेखा पवार या दोघांनाही या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय देताना त्यांनी सांगितले की, लावणीवर प्रचंड प्रेम केल्याचे फळ मला लावणीने आणि साक्षात सरस्वतीने दिले. सहकारी ११ नृत्यांगणांची साथ, नितीन जावळे, गोविंद धुमाळ यांची ढोलकी, करण जावळेंचा तबला आणि अर्जुन जावळेंची हर्मोनियम यांनी तालासुराची चढण अशी झाली की, माझी लावणी महाराष्ट्रात अजिंक्य झाली. दरम्यान चंदन कांबळे याचे गीत-संगीत आणि प्राजक्ता मोहनिम यांचे गायन यांचेही या यशात श्रेय मोठे असून हा सर्व संच माझ्यासाठी भाग्यस्थानी असल्यानेच मला गोवा राज्यात मानाचा भास्कर पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान दिड लाख रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे स्वरुप असलेला हा पुरस्कार वरील मान्यवरांसह पद्मश्री संजय पाटील, नलिनी पोतदार, नृत्यांगणा आरती काळे नगरकर, राजीव लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर वैशाली समसापुरकर यांनी चंद्रसुर्य असे पर्यंत तुम्ही ठेवा लावणी जिवंत ही बैठकीची लावणी तसेच मुजरा, छक्कड आणि लावणीपरी प्रिय तुम्हा बासरी ही गवळण सादर केली. यावेळी सर्वात लक्षवेधी आणि मादक लावणी सादर झाली ती मला म्हणत्यात पुण्याची मैना आणि याच लावणीने उपस्थित तमाम गोवेकर घायाळ झाले आणि महाराष्ट्राच्या या पारंपारीक कलाप्रकाराला जोरदार दाद देवून गेले.