धुराच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्याची ग्रामस्थांची मागणी
कोरेगाव भिमा – पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील ग्राम सभेत शिव चिदंबरम या कंपनीच्या धुराच्या प्रदूषणाचा विषय गाजला असून याप्रकरणी महिला भगिनींसह स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.कंपनीतून निघणारा धूर घातक असून कंपनीतून दुर्गंधी येत असल्याचे सांगत याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्राम सभेत काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत सूचक विशाल परांडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनची भूमिका सांगत कंपनीच्या धुराचे प्रदूषणाचे परिणाम घातक असून कंपनीतून दुर्गंधी येत आहे आजपर्यंत आम्ही कंपनीचा धूर कमी करावा अशी मागणी करत होतो आता कंपनी बंद करण्याची मागणी करत असल्याचे सांगितले.
कंपनीच्या धुरामुळे काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य पंडित थिटे यांनी सर्वांना शांतता राखण्याचे व चांगल्या कामासाठी एकत्र येण्याची सूचना केली. ग्राम पंचायत सदस्य सागर शितोळे यांनी कंपनीशी केलेला पत्रव्यवहार व नोंदी संदर्भात माहिती ग्रामस्थांना दिली.तसेच सदस्य सागर शितोळे यांनी दोन मराठी माणसे कंपनी चालवतात म्हणून सहकार्य केले परंतु कंपनीच्या प्रदूषणाचा गावाला त्रास होत असेल तर चुकीचे असल्याचे मत मांडले.
यावेळी अशोक नाईकनवरे यांनी ग्रामपंचायतीने सदर कंपनीच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी असे मत मांडले.
याबाबत कंपनीने प्रदूषण व इतर शासकीय सर्व परवानग्या काढलेल्या आहेत.कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसून काहीजण जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत – कंपनी व्यवस्थापक सायकर