ज्योत निष्ठेची सावित्रीच्या लेकींची हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा महिला मेळावा पार पडला.या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी काका का? ही कविता सादर केली.काका का? या कवितेतून अजित पवारांवर अमोल कोल्हेंनी निशाणा साधला.या कवितेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनाच प्रतिप्रश्न केला आहे. कोणीतरी म्हणाले की काका का? पण जनता म्हणते अजूनही काकाच का? असा प्रश्न उपस्थित करत कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत. पक्ष मिळाला, चिन्ह मिळाले, सगळं काही मनासारखं झाले तरी अजूनही काकाच का? असा प्रश्नही कोल्हेंनी विचारला आहे.
स. का. पाटलांचा प्रचार करताना ‘पापापा’ असे लिहून प्रचार केला जात होता. पापापा म्हणजेच पाटलाला पाडले पाहिजे, आता ‘काकाका’ असे लिहून प्रचार केला पाहिजे, असे म्हणत काल (ता.14 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संतापले आहेत. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना कवितेच्या माध्यमातून सुनावले आहे.
अमोल कोल्हे यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.यावर अजित पवार गट नेमके काय प्रतिक्रिया देणार हे आगामी काळात दिसेल…