संभाजी ब्रिगेडचे अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन
पुणे – ताथवडे येथे जेएसपीएम कॉलेजच्या जवळील महामार्गाशेजारील मैदानात रविवारी टँकर मधून गॅस चोरी करतानाच मोठा स्फोट झाला. या स्फोटासारखे नऊ मोठे धमाके झाले. शेजारील इमारती हादरल्या. जेएसपीएम शाळेतील तीन बसेस जळून खाक झाल्या. गॅस चोरणारे चोरटे पळून गेले आणि आता पोलिस तपास करत आहेत.
शहरात अशा प्रकारे गॅस रिफिलिंग करताना थेरगाव, चिखली, चिंचवड, पिंपरी येथे दुर्घटना झाल्या. तीनही घटनांतून तीन कंत्राटी कामगार दगावल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.अशा परिस्थिती प्रशासनाला कुठलेच गांभीर्य दिसत नाही. तरी निवासी भागातील सिलिंडरची गोदामे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील अप्पर तहसीलदारांना देण्यात आले.वाल्हेकरवाडी येथील स्वामी विवेकानंद कॉलनीत गेले तीन वर्षांपासून एक गॅसचे मोठे गोदाम भर वस्तीत आहे.
भरलेल्या सिलिंडर टाक्यांचे सात-आठ ट्रक तिथे उभे असतात. भरलेले कमर्शियल सिलिंडरसुध्दा मोठ मोठ्या टाक्यांतून या ठिकाणी ठेवले जातात. तिथेही गॅस रिफिलिंगचा ‘उद्योग’ सुध्दा रात्रभर चालतो.नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यावर पाहणीत तिथे गॅस रिफिलिंगची मशिनरीसुध्दा आढळून आल्या होत्या. निवासी भागातील हे बेकायदा गोदाम त्वरीत बंद करा म्हणून स्थानिक नागरिकांनी मिळून आपल्या महसुल खात्याला लेखी निवेदनही दिले होते.