झोपेत असताना हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयते, धारधार शस्त्रांनी वार केले. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला. मात्र, शंभर फूट अंतरावर तो कोसळला
खडकवासला – मणेरवाडी, घेरा सिंहगड परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्यावर झोपेतच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रकाश हरिसिंग रजपूत (वय १५, रा. आनंदवन सोसायटी, मणेरवाडी), असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अद्याप हत्येचे कारण, तसेच आरोपींची माहिती मिळाली नाही. प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिकत होता.
प्रकाश हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सकाळी शाळेत त्याचे इतर विद्यार्थ्यांबरोबर भांडण झाले होते. साडेदहा वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला होता. त्याचे आई-वडील कामावर गेले होते, तर भाऊ दहावीच्या परीक्षेला गेला होता. मणेरवाडी हद्दीतील डोंगरावरील आनंद सोसायटीतील फार्ममधील घरात प्रकाश हा झोपेत असताना हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयते, धारधार शस्त्रांनी वार केले. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला. मात्र, शंभर फूट अंतरावर तो कोसळला. हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, अंमलदार संतोष तोडकर, संतोष भापकर आदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
प्रकाश हा स्वभावाने शांत होता. तो एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करून आई-वडिलांना हातभार लावत होता. वर्गातही तो हुशार होता.